Virat Kohli Response to Australia Prime Minister on Perth Test Watch Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळवला गेला आणि या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता भारतीय संग या मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून खेळणार आहे. तत्पूर्वी टीम इंडिया प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरूद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. भारत आणि प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यातील सराव सामना ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची भेट घेतली.
दोन दिवसीय सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय संघ आणि प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाची भेट घेतली. कॅनबेरा येथील संसद भवनात ही भेट झाली. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दोन्ही संघांबरोबर फोटो काढला आणि टीम इंडियाबरोबर सेल्फीही काढला. तर भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅनबेरा येथील संसदेत भाषणही केले.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान संघाच्या प्रत्येक खेळाडूची भेट घेत त्यांच्याशी गप्पा मारल्या. यादरम्यान रोहित शर्माने आधी उपकर्णधार जसप्रीत बुमराहची ओळख करून दिली. बुमराहच्या कामगिरीचे खुद्द पंतप्रधानांनीही कौतुक करत त्याला स्टार म्हणाले. यानंतर बुमराहच्या बाजूला विराट उभा होता. त्यानंतर रोहितने विराटचं नाव सांगितलं पण त्याआधीच पंतप्रधानांनी हॅलो म्हणत विराटशी बोलणं सुरू केलं.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान कोहलीला म्हटलं की, “पर्थमधील तुझी कामगिरी खूप शानदार होती. तू अशावेळी एक चांगली खेळी केलीस जेव्हा आम्ही आधीच बॅकफूटवर होतो. यावर विराट कोहली म्हणाला, थोडं अजून मसालेदार केलं.” यावर पंतप्रधान म्हणाले, “हो तुम्ही भारतीय आहात.”
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी या भेटीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं की, “या आठवड्यात मनुका ओव्हल मैदानावर शानदार भारतीय संघाचं प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघासमोर मोठे आव्हान आहे. पण मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितल्याप्रमाणे ऑसी संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाठिंबा देणार आहे. “
हेही वाचा – RCB Hindi Post: RCB वर चाहते भडकले, हिंदी सोशल मीडिया अकाऊंट सुरू केल्याने चाहत्यांचा रोष; नेमकं काय घडलं?
आता संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघात सामील झाला असून तो दुसऱ्या कसोटी सामन्यापासून आपली जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहितच्या जागी जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत भारताचे नेतृत्व केले.