ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि तेथील प्रेक्षक प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काहीही करू शकतात. याची आपण आतापर्यंत अनेक उदाहरणे बघितली आहेत. भारतीय खेळाडूंना तर प्रत्येक ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशा प्रकारांचा सामना करावा लागतो. याचा बदला म्हणून इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात काही भारतीय प्रेक्षकांनीदेखील ऑस्ट्रेलियन खेळाडूला चिडवण्यास सुरुवात केली होती. मात्र, तत्कालीन भारतीय कर्णधाराने प्रेक्षकांना असे करण्यापासून थांबवले. फक्त थांबवलेच नाही तर त्यांच्याकडून त्या ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी टाळ्या वाजवून घेण्याचा मोठेपणाही दाखवला होता. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता, स्टीव्ह स्मिथ.
विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथची सतत एकमेकांशी तुलना केली जाते. दोन्ही खेळाडूंमध्ये क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा किरकोळ वादही झालेले आहेत. मात्र, ९ जून २०१९ रोजी म्हणजे आजपासून तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवली. इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानावर कोहलीने आपल्या या कृतीने ऑस्ट्रेलियन चाहत्यांचीदेखील मने जिंकली होती.
विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन कर्णधार कोहली फलंदाजी करत होता. भारतीय फलंदाजांनी कांगारू गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला होता. ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिंचने स्मिथला सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी पाठवले होते. तिथे उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांनी स्मिथला चिडवायला सुरुवात केली. प्रेक्षक त्याला ‘चीटर’ म्हणून चिडवत होते. त्यावेळी फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला प्रेक्षकांचे हे वागणे आवडले नाही. यावर हातवारे करून त्याने नाराजी व्यक्त केली. शिवाय त्याने प्रेक्षकांना स्मिथसाठी टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यासही सांगितले होते.
बॉल टॅम्परिंगचे आरोप सिद्ध झाल्यानंतर स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर २०१८ मध्ये एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हे दोन्ही खेळाडू २०१९ च्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात परतले होते. ही गोष्ट लक्षात ठेवून प्रेक्षकांनी स्टीव्ह स्मिथला चिडवण्यास सुरुवात केली होती. मात्र, विराट कोहलीने खेळभावना दाखवून सर्वांची मने जिंकली होती.