मुंबई : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने आपला आदर्श सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम तर मोडलाच, पण तो इतक्यातच थांबणार नाही. सचिनचा १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडण्याचीही कोहलीमध्ये क्षमता असल्याचे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

कोहलीने बुधवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ११७ धावांची खेळी केली. हे त्याचे ५०वे एकदिवसीय शतक ठरले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला. यासह कोहलीने कसोटीत २९ आणि ट्वेन्टी-२०मध्ये एक शतक केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता त्याच्या नावे एकूण ८० शतके आहेत.

हेही वाचा >>> World Cup : भारत जिंकावा म्हणून चाहत्याने बटाट्यावर लावल्या २४० अगरबत्या; स्विगीने केले ट्विट, फोटो झाला व्हायरल

‘‘सचिन तेंडुलकरने १०० शतके केली, तेव्हा त्याच्या या विक्रमाच्या आसपासही एखादा फलंदाज पोहोचेल असा कोणी विचारही केला नसेल. मात्र, कोहलीच्या नावे आता ८० शतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वाधिक ५० शतके झाली आहेत. हे अविश्वसनीय आहे,’’ असे शास्त्री म्हणाले.

‘‘कोहलीसारख्या खेळाडूसाठी अशक्य असे काहीच नाही. त्याच्यासारखे महान फलंदाज जेव्हा लयीत असतात आणि शतके करत असतात, तेव्हा ते सहजासहजी थांबत नाहीत. त्यांचा शतकांचा आकडा झटपट वाढत जातो. कोहलीने पुढील १० डावांमध्ये पाच शतके केली, तर आश्चर्य वाटायला नको. कोहली क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत खेळतो. तो आणखी तीन-चार वर्षे तरी खेळेल. या काळात तो किती मोठी मजल मारू शकतो याचा अंदाज बांधणेही अवघड आहे,’’ असेही शास्त्री म्हणाले.

शास्त्री यांनी बराच काळ भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. या काळात त्यांना कोहलीला जवळून पाहता आले. कडक डाएट, शिस्त आणि तंदुरुस्ती या गोष्टी कोहलीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात असे शास्त्री यांनी नमूद केले.

कोहली, रोहित यांच्याकडून खूप शिकण्यासारखे – गिल

कोहलीची धावांची भूक आणि त्याची ऊर्जा मला प्रेरित करते. तसेच सलामीला रोहित शर्मासोबत खेळण्याची संधी मिळत असल्याने त्याच्याकडूनही खूप गोष्टी शिकायला मिळत असल्याचे भारताचा सलामीवीर शुभमन गिलने नमूद केले. ‘‘विराट भाई जेव्हाही मैदानावर उतरतात, तेव्हा काही तरी नवा विक्रम रचतात. गेल्या १०-१५ वर्षांपासून त्यांनी ज्या सातत्याने धावा केल्या आहेत, त्याने मला खूप प्रेरित केले आहे. फलंदाज म्हणून कौशल्य किंवा क्षमतेपेक्षाही त्यांच्यातील धावांची भूक आणि ते ज्या ऊर्जेने खेळतात त्याने मला खूप प्रेरणा मिळते,’’ असे कोहलीबद्दल गिल म्हणाला.