Virat Kohli Reveals About Farmhouse Cricket Pitch in Alibaug : विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेला खेळाडू आहे. त्याच्या फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचे २५७ दशलक्ष फॅन फॉलोवर्स आहेत. तो नियमितपणे त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करतो आणि ते वणव्यासारखे व्हायरल होतात. मात्र, आता या दिग्गज भारतीय फलंदाजाने त्याच्याशी संबंधित पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विराट कोहलीने मंगळवारी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावरील कमाईचा दावा करणाऱ्या बातम्या खोट्या असल्याच्या सांगितल्यानंतर, विराट कोहलीने मंगळवार १५ ऑगस्ट २०२३ रोजी आणखी एक दावा फेटाळला. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या अलिबाग फार्महाऊसवर ‘क्रिकेट पिच’ बनवणार आहेत, असे द टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटले होते. विराट कोहलीने या बातमीचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर केला. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लहानपणापासून वाचत असलेल्या वर्तमानपत्रानेही फेक न्यूज प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे.’

विराट कोहलीची इन्स्टाग्रामवरील व्हायरल स्टोरी

सोमवारी १४ ऑगस्ट २०२३ रोजी एका आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकात आलेल्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराटने फार्महाऊस बांधण्यासाठी अलिबागमधील ८ एकर जमिनीवर १९.२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. दुसर्‍या पब्लिशिंग हाऊसचा हवाला देत अहवालात नमूद करण्यात आले होते की, विराट या मालमत्तेवर क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यास उत्सुक होता. तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, विराट कोहली इंस्टाग्रामवर प्रत्येक पोस्टसाठी तब्बल ११.४७ कोटी रुपये आकारतो. पण भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधाराने सोशल मीडियावरील कमाईवर मौन सोडले आणि अशा बातम्यांचे खंडन केले होते.

हेही वाचा – Virat Kohli: “२०१९ मध्ये मला कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवायचे होते, कारण…”; रवी शास्त्रींचा मोठा खुलासा

विराट कोहलीने शनिवारी, १२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी त्याच्या अधिकृत एक्स खात्यावर लिहिले होते की, त्याच्या आयुष्यात जे काही मिळाले त्याबद्दल तो कृतज्ञ आहे, परंतु त्याच्या सोशल मीडिया कमाईबद्दलच्या बातम्या खोट्या आहेत. विराट कोहलीने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आयुष्यात मला जे काही मिळाले. त्याबद्दल मी कृतज्ञ आणि ऋणी आहे, पण माझ्या कमाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्या खऱ्या नाहीत.”

विराट कोहली आशिया कपच्या तयारीत व्यस्त –

विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. कॅरेबियन दौऱ्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२३ च्या तयारीत तो व्यस्त आहे. भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2023 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध २ सप्टेंबर रोजी पल्लिकेल येथे करणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has denied claims that he is building a cricket pitch at a farmhouse in alibaug vbm