भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. भारतीय संघाचा तो स्टार खेळाडू असून आपले व्यक्तिमत्त्व आणि खेळाच्या जोरावर त्याने क्रिकेट जगतात महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये आपले स्थान मिळवलेले आहे. सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या स्पर्धेत विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये आहे. मागील काही सामन्यांत त्याने दिमाखदार खेळ करत भारताला विजय मिळवून दिला आहे. एकीकडे चांगला खेळ करत असताना विराट कोहलीने समाजमाध्यमावर त्याच्यासोबत घडलेल्या एका घटनेबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या खोलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. याच कारणामुळे इतरांचे खासगी आयुष्य जपायला हवे, असे म्हणत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विराट कोहली राहात असलेल्या हॉटेलमधील खोलीचा असून यामध्ये विराटचे बूट, चष्मा, कपडे दिसत आहेत. याच कारणामुळे विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी तसेच त्याला भेटण्यासाठी चाहते आतूर असतात, याची मला कल्पना आहे. याबाबत काहीही गैर नाही. मात्र हा व्हिडीओ पाहून मी नाराज झालो असून माझ्या खासगी आयुष्याबाबत मी चिंतीत आहे. माझ्या स्वत:च्या खोलीमध्येही माझा खासगीपणा अबाधित नसेल, तर मग मी खासगी जागेची अपेक्षा कुठे करावी? कोणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप करणे चुकीचे असून मला हे मान्य नाही,’ असे म्हणत विराटने आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. त्यांच्या खासगी जीवनाचा मनोरंजनासाठी वापर करू नका, असे आवाहनही त्याने केले आहे.

दरम्यान, विराट कोहलीने व्हिडीओ पोस्ट करत नाराजी व्यक्त केल्यानंतर विराटची पत्नी अनुष्का शर्मासह जगभरातील क्रिकेटपटू तसेच अभिनेता-अभिनेत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्याही खासगी जीवनात अशा प्रकारे हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच विराट कोहलीच्या या भूमिकेचेही सर्वांनीच समर्थन केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli has expressed displeasure after his hotel room video went viral prd