पर्थ कसोटी सामन्यात टीम पेन सोबत झालेल्या वादावादीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक माजी खेळाडूंनी विराटच्या आक्रमक स्वभावावर टीका केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांच्या मते कोहली भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा वारसा पुढे चालवतो आहे. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बुकानन यांनी विराट कोहली आणि सौरव गांगुलीतल्या साम्याबद्दल चर्चा केली.

“सामन्यात कितीही बिकट आली तरीही मागे हटायचं नाही, विराट कोहली सौरव गांगुलीचा वारसा पुढे चालवतो आहे. साहजिकच त्याची आपल्या सहकाऱ्यांकडूनही हीच अपेक्षा असते. एखादा सामना कसा खेळावा याचं मूर्तिमंत उदाहरण कोहली देतो आहे, प्रत्येक वेळी सामना हा तांत्रिकदृष्ट्या कसा खेळला गेला हे न पाहता कर्णधाराने संघाचं नेतृत्व कसं केलं हे देखील पाहलं जातं.” बुकानन यांनी विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचं समर्थन केलं. विराट मैदानात असला की सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत येते. विराटला खेळाप्रती आदर आहे. आजच्या घडीला तो भारतीय क्रिकेटचा नायक आहे. बुकानन यांनी कोहलीच्या नेतृत्वगुणाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट कोहली वाघ, त्याला पिंजऱ्यात कैद करु नका !

पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा विचार केला असता, कोहली-पुजाराचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकले नाहीयेत. विराटने पर्थ कसोटीत शतकी खेळी केली, मात्र त्याला इतर फलंदाजांची योग्य साथ लाभली नाही. त्यातच मुंबईकर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संघाबाहेर पडल्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार हा प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे. पृथ्वीच्या जागी मयांक अग्रवालला संघात जागा देण्यात आली आहे. याचसोबत हार्दिक पांड्यानेही संघात पुनरागमन केलं आहे, त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट कोहली भारतीय संघाचा उर्जास्त्रोत !

Story img Loader