भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये तो आपला सहकारी शिखर धवनच्या फलंदाजीची शैलीची नक्कल करताना दिसत आहे. त्याने या व्हिडिओमध्ये शिखर धवनचे हुबेहुब अनुकरण केले, ज्यात तो फलंदाजीच्या आधी आणि नंतर काय करतो आणि तो कसा प्रतिक्रिया देतो, हे दाखवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात असून कोहली-धवनच्या मैत्रीचीही वाहवा होत आहे.
हा व्हिडिओ अपलोड करताना विराट कोहली म्हणाला, ”मी शिखर धवनची नक्कल करणार आहे. कारण मला वाटते की जेव्हा तो खेळतो तेव्हा तो स्वतःमध्ये हरवून जातो, जे खूपच हास्यास्पद आहे. दुसऱ्या टोकाला फलंदाजी करताना मी त्याला अनेक वेळा पाहिले आहे.” विराट या व्हिडिओत शिखर धवनचे उत्तम प्रकारे अनुकरण करतो. लोकांनी त्याच्या अभिनय कौशल्याची प्रशंसाही केली आहे.
या व्हिडिओननंतर विराटने शिखऱला ही नक्कल कशी वाटली असे विचारले. धवननेही उत्तर देताना एक इमोजी पोस्ट केला. याशिवाय अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान देखील आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात शिखर धवन भारतीय संघाचा भाग नाही. या निर्णयामुळे अनेक क्रिकेटपंडित आश्चर्यचकित झाले होते.
हेही वाचा – टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होताच भारताला बसला ‘जबर’ धक्का!
भारतीय संघ २४ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्डकपमध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. या स्पर्धेनंतर विराट टी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल. कर्णधार म्हणून त्याचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक असू शकतो. अशा परिस्थितीत भारतीय संघ कर्णधाराला जेतेपदासह निरोप देऊ इच्छितो.