न्युझीलंडविरूद्धच्या पराभूत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संकटकाळी भारतीय संघाच्या मदतीस धावून येणारा विराट कोहली आपल्या वैयक्तिक फलंदाजीतील कामगिरीच्या जोरावर आयसीसी ने जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये अव्वलस्थानाच्या जवळ येऊन ठेपला आहे. ४-० अशा फरकाने भारताने ही मालिका गमावली असली तरी पाच सामन्यांच्या या मालिकेत विराट कोहलीने २९१ धावा केल्या होत्या. विराटच्या या कामगिरीमुळे त्याच्या एकूण गुणसंख्येत ११ गुणांची भर पडल्यामुळे ती आता ८७० वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असणा-या ए बी डिव्हिलियर्सची बरोबरी करण्यासाठी विराटला आता केवळ दोन गुणांची गरज आहे. भारताचा कर्णधार आणि घरच्या मैदानावर हमखास यशस्वी ठरणारा फलंदाज महेंद्रसिंग धोणी या क्रमवारीत नवव्या स्थानावर तर न्युझीलंडमधील खराब कामगिरीमुळे शिखर धवनची क्रमवारीत ११व्या स्थानी घसरण झाली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहाजणांमध्ये  रवींद्र जडेजाच्या रूपाने एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. नवव्या स्थानावर असणा-या असलेल्या रविंद्र जडेजाची क्रमवारीत तीन क्रमांकांनी घसरण झाली आहे.