दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांना चीतपट केल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी सज्ज होता. पुण्यनगरी कसोटी पदार्पणासाठी तयार होती. मात्र घडलं भलतंच. तीन दिवसांत भारतीय संघाचं पानिपत झालं. विजयरथावर आरूढ झालेल्या भारतीय संघासाठी हा अनपेक्षित धक्का होता. घोटीव सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या संघाकडून इतकी सर्वसाधारण कामगिरी कशी काय झाली, असा प्रश्न सर्वानाच पडला. तंत्रकौशल्य, अनुभव या सगळ्याबाबतीत पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत आघाडी घेतली. या धक्क्यातून सावरण्यासाठी खेळाडूंना वेगळ्या वातावरणात नेणं अत्यावश्यक होतं आणि नेमकं हेच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी जाणलं. वर्षांच्या ३६५ दिवसांपैकी ३३० दिवस खेळणाऱ्या भारतीय संघाला बदल हवा होता. प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि चाहते या सगळ्यांना कसोशीने दूर ठेवत भारतीय संघ पुण्याहून कोकणला जाण्याच्या मार्गावर असणाऱ्या ताम्हिणी घाटासाठी रवाना झाला. सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत प्रदूषणविरहित वातावरणात सूर्योदय त्यांनी अनुभवला. सांघिक भावना दृढ होईल अशा मजेशीर खेळांमध्येही भारतीय संघ सहभागी झाला. क्रिकेटपासून सर्वथा दूर अशा वातावरणात नवी ऊर्जा मिळालेल्या भारतीय संघानं बेंगळूरु कसोटीत जे नव्हत्याचं होतं केलं, ते सर्वासमोर आहे.

मनोरंजन हा हेतू बाजूला सारून खेळाचे व्यावसायीकरण झाल्यालाही अनेक वर्षे झाली आहेत. खेळ आणि खेळाडू यांच्या निमित्ताने प्रचंड अर्थकारण उभं राहिलं आहे. त्यामुळे खेळाडूंच्या आयुष्याला यंत्रवत स्वरूप आलं आहे. भौगोलिक वातावरण कितीही प्रतिकूल असो, वेळ कोणतीही असो, खेळाडूंनी अविरत खेळणं क्रमप्राप्त झालं आहे. एकामागोमाग आयोजित भरगच्च दौरे, सराव शिबिरं, प्रवास यामुळे खेळाडूंना मोकळा श्वास घ्यायला वेळच मिळेनासा झाला आहे. खेळण्याबरोबरीनं जिंकण्याचं दडपण जास्त आहे. यश मिळालं की जाहिरातींचे करार, सदिच्छादूत म्हणून नियुक्ती हे सगळं अवलंबून असल्यानं जिंकण्याची सक्ती झाली आहे. या सक्तीच्या खेळात दुखापत होऊ नये म्हणून किंवा दुखापतग्रस्त असल्यास त्यातून सावरण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. वैैयक्तिक किंवा सांघिक सपोर्ट स्टाफ अर्थात सहयोगींची नियुक्ती केली जाते. यांच्या माध्यमातूनच खेळाडूंनी कधी तरी कामापल्याडचा विचार करावा, मोकळं व्हावं यासाठी कॉर्पोरेट पद्धतीप्रमाणे अनोखे उपाय शोधण्यात आले आहेत. सतत एकच गोष्ट  करून कंटाळलेल्या खेळाडूंसाठी काही वर्षांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बूट कॅम्प आयोजित केला होता. गेल्या वर्षी सख्खे शेजारी असणाऱ्या पाकिस्तान संघाचंही असं शिबीर झालं. तंदुरुस्तीप्रति गांभीर्य नसणाऱ्या खेळाडूंना वठणीवर आणणं हा या शिबिराचा सुप्त हेतू होता.

मूळ कामापासून विलग होणं आवश्यक असतं. पराभव, अपयशाला कसं सामोरं जातात ते फार महत्त्वाचं असतं. त्यात अडकून न राहता सकारात्मक गोष्टी घेऊन बाहेर पडायला हवं. काही खेळाडू सरावाला लागले की इतिहास विसरून जातात. त्यांना वेगळ्या प्रेरणेची आवश्यकता नसते. काही जण पराभवानंतर खेळापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पण तसं केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटतं आणि दोन-तीन दिवसांत ते पुन्हा खेळाकडे वळतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाची कार्यपद्धती वेगवेगळी असते. कोणताही खेळ व्यावसायिक स्तरावर खेळणं जिकिरीचं असतं. खूप पातळ्यांवर मेंदू कार्यरत असतो. अशा वेळी त्या गोष्टीपासून पूर्णत: दूर अलिप्त अशी गोष्ट करणं गरजेचं असतं. त्या दिवशी खेळाचा विचार करायचा नाही, सराव करायचा नाही, व्यायामही नाही. चित्रपट पाहायला जाणं, कॉफीशॉप-शॉपिंग, मित्रमैत्रिणींचं गेट टुगेदर असं काहीही. मन ताजंतवानं होऊन पुन्हा जोमानं कामाला लागता यायला हवं.

आमचे प्रशिक्षक आम्हाला मासेमारीला घेऊन जायचे. आमचं वेळापत्रक भरगच्च असे. सतत सराव, रणनीती अशा गोष्टी असत. त्यातून बाहेर येण्यासाठी मासेमारीचा फंडा अवलंबला जात असे. मासेमारीसाठी भन्नाट जागा त्यांनी शोधून काढली होती. मासेमारी ही संयमाची परीक्षा असते. पण एखादा मासा गळाला लागला की प्रचंड आनंद होतो. त्या सरोवरातलं आणि आजूबाजूचं वातावरण खूप शांत असतं. त्याने प्रसन्न वाटतं. एकाग्रतेसाठी मदत होते. ट्रेकिंग, सायकलिंग याही गोष्टी उपयुक्त ठरतात. नवीन पिढी उत्साही आहे, त्यांच्यात प्रचंड ऊर्जा सामावली आहे. आम्ही खेळायला सुरुवात केली तेव्हा नेमबाजी केंद्र शोधा, अ‍ॅम्युनिशन कुठून आणायचं, कस्टम्सचे नियम अशा तांत्रिक मूलभूत गोष्टींची पूर्तता करण्यात आमचं डोकं आणि वेळ खर्च व्हायचा. नव्या पिढीचं तसं नाही. सगळं चटकन उपलब्ध आहे. अर्थातच स्पर्धाही खूप तीव्र झाली आहे. जिंकण्याचं दडपण जास्त आहे. त्यामुळे नव्या पिढीला असे उपक्रम मोकळं करतात. ‘अ‍ॅक्टिव्ह रेस्ट’ म्हणजेच सक्तीची विश्रांती अशी संज्ञा आम्ही वापरतो. ती मिळणं अत्यावश्यक आहे.

खेळाडू, पालक, संघटक एकूणच मानसिक कणखरता यासंदर्भात जागरूकता नाहीये. क्रीडा मानसशास्त्रज्ञांची संख्याही खूप नाहीये. कामगिरी उत्तम होण्यासाठी मन:स्थिती शांत असणं गरजेचं असतं. ती असण्यासाठी भक्कम मानसिक पाठिंबा लागतो. तो सगळ्यांनाच मिळतो असं नाही. अगदी कमी खेळांमध्ये क्रीडा मानसोपचारतज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. बाकी खेळ आणि खेळाडू उपेक्षितच राहतात. दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंना तुम्हीही अव्वल होऊ शकता किंवा आहात हे बिंबवणं आवश्यक असतं. त्यासाठी त्यांना प्रेरित करावं लागतं नाही तर न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.

अंजली भागवत, अव्वल नेमबाज व प्रशिक्षक

एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी झाल्यानंतर प्रशिक्षक विश्रांती घेण्याचा सल्ला देतात. ताणतणाव हलका करण्यासाठी संगीत कार्यक्रमाला जातो तर कधी आठ-दहा जण मिळून आवडता चित्रपट पाहायला जातो. कधी स्नेहमेळावा रंगतो. त्या वेळी खेळाविषयी शक्यतो बोलत नाही.

तन्वी लाड, आंतरराष्ट्रीय बॅडमिंडनपटू

प्रशिक्षकांची भूमिका बदलली आहे. खेळाडूंच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना योग्य वेळी खेळापासून दूर नेणं ही गरज झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी घरच्या घरी मेजवानीचं आयोजन केलं जातं. कधी टेबल टेनिस सोडून अन्य खेळ खेळतो.

शैलजा गोहाड, टेबल टेनिस प्रशिक्षक

खेळाडूच्या आयुष्यात अनेकदा क्षीण येतो, जो शारीरिक कमी आणि मानसिक जास्त असतो. रोजच्या कामातून विश्रांती आवश्यक होते. मन थकलंय, हे देहबोलीतून जाणवतं. काही खेळाडूंना एखाद दोन दिवस पुरतात तर काहींना १५ दिवस लागतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडू पराभव योग्य पद्धतीने हाताळतात. पराभवाने खचून जात नाहीत. मात्र दुसऱ्या फळीतल्या खेळाडूंसाठी सतत दुय्यम असणं, २-३ वर्षे सातत्याने पराभवाला सामोरे जावं लागणं, दुखापतीमुळे खेळता न येणं यामुळे मानसिकतेवर परिणाम होतो. अशा गोष्टी ज्यातून खेळ दूर असेल. आणि अशा गोष्टी सक्तीने होत नाहीत. खेळाडूने त्यातून आनंद घेणं महत्त्वाचं असतं. अनेक खेळाडू स्वत:चा सोडून दुसरा खेळ खेळतात. त्यांच्यासाठी दुसरा खेळ खेळणं मन दुसरीकडे वळवण्याचा पर्याय असतो. चित्रपट, गाण्याची मैफल, मित्रमैत्रिणींना भेटणं, पोहायला जाणं, गिर्यारोहण असलं काहीही समाविष्ट असतं. आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचं वेळापत्रक अतिव्यस्त असतं. स्पर्धा, सराव, व्यावसायिक उपक्रम, कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळून अशा उपक्रमांसाठी वेळ काढावा लागतो. त्यांना मुख्य प्रवाहात राहणं क्रमप्राप्त असतं. मानसिकतेबाबत जागरूकता नाही. या क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्याही कमी आहे. ‘तणावमुक्ती आणि सावरणे’ अशा दोन गोष्टी असतात.

मुग्धा बवरे, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ