भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे. गंभीर दुखापत झाली असल्याने विराट कोहली विश्रांती घेत असून लवकरच आपण पुनरागन करु असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. विराट कोहली नेहमीच आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देत असतो. यासोबतच आपल्या लूकच्या बाबतीतही तो विशेष काळजी घेत असतो. विराटाची दाढी त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते, त्यामुळे तो आपला लूकही बदलताना दिसत नाही. अनेक नवे क्रिकेटर्स विराटचा लूक कॉपी करताना दिसत असतात. विराटचं हे दाढीप्रेम एवढ्यावरच थांबलेलं नसून त्याने आता चक्क दाढीचा विमा काढला आहे.

के एल राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये विराट कोहली सोफ्यावर बसलेला असताना दोन व्यक्ती त्याचे फोटो काढत आहेत. एका व्यक्तीने त्याच्या दाढीचा एक केस कापून एका प्लास्टिकमध्ये ठेवल्याचंही दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं दिसत आहे. ट्विट करताना के एल राहुलने लिहिलं आहे की, ‘मला माहित होतं तुझं तुझ्या दाढीवर प्रचंड प्रेम आहे, पण आता तिचा विमा काढून तू माझी थिअरी खरी ठरवली आहेस’.

व्हिडीओत पाहिलं तर सगळं झाल्यानंतर विराट कोहली एका कागदावर सही करतानाही दिसत आहे. आता कोहलीने खरोखर दाढीचा विमा काढला आहे की के एल राहुल थट्टा करत आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जोपर्यंत विराट कोहली स्वत: स्पष्ट करत नाही तोपर्यंत हे गूढच राहिल. काहीजणांच्या मते दिल्लीनंतर लंडनमध्ये कोहलीचा मेणाचा पुतळा लावण्यात येणार असून त्यासाठीची ही तयारी असावी.

Story img Loader