संदीप कदम, लोकसत्ता
कोलकाता : ज्याला आदर्श मानून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, २०११चा विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या खांद्यावर बसवून ज्याला वानखेडे स्टेडियमची फेरी मारली, त्याच सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांची बरोबरी विराट कोहलीने कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर आपल्या ३५व्या वाढदिवशी केली. या कामगिरीनंतर सर्वत्र स्टेडियममध्ये ‘कोहली..कोहली’चा जयघोष सुरू होता.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या ४९ व्या षटकात कगिसो रबाडाच्या चेंडूवर एक धाव घेत कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले ४९ वे शतक पूर्ण केले आणि ईडन गार्डन्सवर सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कोहलीने आपले हॅल्मेट काढून उपस्थित चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. त्याने जोरात जल्लोष केला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसत होती.
ईडन गार्डन्सवर २२ वर्षांपूर्वी व्ही. व्ही. एस लक्ष्मणने २८१ धावांची अविस्मरणीय खेळी केली आणि २०१४ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च २६४ धावांच्या खेळीचा विक्रम रचला होता. त्याच मैदानावर रविवारी भारतीय क्रिकेटचा आणखीन एक अध्याय लिहिला गेला. कोहलीने आपल्या २८९ व्या एकदिवसीय सामन्याच्या २७७ व्या डावात ४९ वे शतक साजरे केले. तेंडुलकरने ४६३ सामन्यांच्या ४५२ डावांत ४९ शतके आणि ९६ अर्धशतके झळकावली होती. सचिनच्या नावे शंभर आंतरराष्ट्रीय शतके आहेत, तर कोहलीचे हे ७९ वे शतक ठरले.
कोलकातामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोहलीचा जन्मदिवस आणि त्याच्या ४९व्या शतकाची प्रतीक्षा होती. स्टेडियममध्ये अनेक जण १८ क्रमांकाची ‘जर्सी’ परिधान करून आले होते. कोहलीने ११९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध त्याचे शतक १२ धावांनी हुकले होते. मात्र, कोलकाता येथे त्याने सचिनच्या विक्रमी आकडय़ाला गाठलेच. कोलकाता हे फुटबॉलसाठी ओळखले जाते. मात्र, ईडन गार्डन्सवरील चाहत्यांचा उत्साह मोहन बागान व ईस्ट बंगाल यांच्यातील सामन्याच्या रोमांचालाही मागे टाकले असा होता.
हेही वाचा >>>IND vs SA: हिटमॅनला सर्वाधिक वेळा बाद करणारा रबाडा ठरला पहिला गोलंदाज, रोहित-शुबमनने केला ‘हा’ विक्रम
कोलकातावासीयांसाठी अविस्मरणीय दिवस
कोहलीचा ३५ वा जन्मदिवस आणि सचिन तेंडुलकरच्या ४९ व्या शतकांची बरोबरी, यामुळे कोलकाता येथील स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. कोलकातामध्ये क्रिकेटचा सामना असला की, उत्साहाला उधाण असते. त्यामुळे सकाळपासूनच चाहत्यांची स्टेडियमबाहेर गर्दी पाहायला मिळाली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात दाखल झालेल्या विराटचे स्वागत ‘कोहली..कोहली’च्या जयघोषाने झाले. सर्व स्टेडियममध्ये केवळ एकच नाव ऐकण्यास येत होते, ते म्हणजे कोहली. संपूर्ण ईडन गार्डन्स हे कोहलीमय झाले होते. ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी ओळख असलेला सौरव गांगुलीच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य पाहायला मिळाले. कोहलीच्या प्रत्येक फटक्यावर चाहते जल्लोष करायचे. तर, प्रत्येक निर्धाव चेंडूवर स्टेडियममध्ये एकच शांतता पसरायची. कोहलीसाठी हे शतक जसे संस्मरणीय राहील, तसेच कोलकातावासीयांसाठी देखील हा क्षण नेहमीच लक्षात राहील, हे नक्की.
विराट कोहलीने रविवारी आपला ३५ वा वाढदिवस शतकासह साजरा केला. त्याच वेळी ईडन गार्डन्सवर उपस्थित चाहत्यांनी कोहलीसाठी विशेष शुभेच्छांचे फलक आणले होते. तसेच सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघातील कोहलीचा माजी सहकारी एबी डिव्हिलियर्स, तसेच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीची भेट घेत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
७९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावे आता ७९ शतके आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील ४९वे शतक केले. तसेच कसोटीत २९, तर ट्वेन्टी-२०मध्ये एक शतक त्याने केले आहे.
सर्वाधिक एकदिवसीय शतके
’विराट कोहली : ४९ (२७७ डाव)
’सचिन तेंडुलकर : ४९ (४५२ डाव)
’रोहित शर्मा : ३१ (२५१ डाव)
’रिकी पॉटिंग : ३० (३६५ डाव)
’सनथ जयसूर्या : २८ (४३३ डाव)