ऑस्ट्रेलियाला ४-१ ने हरवल्यानंतर सध्या विराट कोहलीवर सर्व बाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही विराटचं कौतुक केलंय. आगामी २०१९ विश्वचषकासाठी विराट कोहली भारतीय संघाला योग्य पद्धतीने ध्येयाकडे नेत असल्याचंही सौरव गांगुली म्हणाला. मात्र विराट कोहलीची खरी परीक्षा ही दक्षिण आफ्रिका दौऱ्यात असल्याचंही गांगुलीने नमूद केलंय.
“एक चांगला कर्णधार होण्याचे विराट कोहलीत सर्व गूण आहेत, यात काहीच शंका नाही. माझ्या मते पुढचे १५ महिने विराट कोहली आणि भारतीय संघासाठी महत्वाचे आहेत. ज्यावेळी भारताचा संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल त्यावेळी विराट कोहली आणि भारतीय संघाची गुणवत्ता खऱ्या अर्थाने तपासली जाईल. घरच्या मैदानावर खेळताना खेळाडूंना संधी देणं, संघात बदल करणं यासारख्या गोष्टी विराट अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळतो आहे.” विराटच्या नेतृत्वाखील खेळणाऱ्या भारतीय संघाचं गांगुलीने कौतुक केलं.
महेंद्रसिंह धोनीकडून विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व आल्यानंतर भारतीय संघाच्या कामगिरीत चांगलीच सुधारणा झाली आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यात घरच्या आणि परदेशात भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय. सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी आणि वन-डे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात दोन हात करणार आहे. त्यानंतर डिसेंबरच्या अखेरीस भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होईल.