महेंद्रसिंग धोनीने पत्करलेली कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती ही जरी तडकाफडकी असली तरी भारतीय क्रिकेटला ती नवी दिशा देणारी आहे. नवनिर्वाचित कर्णधार विराट कोहली नेतृत्वाच्या नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ लॉसन यांनी व्यक्त केले आहे.
‘‘अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीत कोहलीची नेतृत्वक्षमता मी पाहिली आहे. कर्णधारपद सांभाळण्यासाठी तो सक्षम असल्याचे त्याच्या खेळातून दिसून येत होते. तो कर्णधार असताना सर्वात कमी बोलतो, जी सर्वात चांगली गोष्ट आहे. याशिवाय अन्य खेळाडू आणि पंच यांचा तुम्ही आदर करून आदर निर्माण करायला हवा. त्याने आपले काम चोख बजावले होते. त्यामुळेच तो भारताला नवी दिशा देईल,’’ अशी आशा लॉसन यांनी प्रकट केली.
धोनीच्या निवृत्तीविषयी लॉसन म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियातील अखेरची कसोटी यशस्वी करण्याची संधी धोनीला चालून आली होती. ही कसोटी जिंकून आपले कसोटी नेतृत्व त्याला सिद्ध करता आले असते. या विजयी सामन्यासह त्याला योग्य रीतीने अलविदा करता आला असता.’’
‘त्या’ चार षटकांत हेझलवूडला भारतीयांवर आक्रमण करायचे होते
सिडनी : मेलबर्न कसोटीत चौथ्या डावात चार षटके शिल्लक असतानाच दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णीत सोडण्यास मान्यता दिली. भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. महेंद्रसिंग धोनी आणि रविचंद्रन अश्विन यांनी निर्धाराने फलंदाजी करीत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. मात्र त्या चार षटकांत भारतीय फलंदाजांवर जोरदार आक्रमण करण्याचा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा विचार होता. या चार षटकांतही उरलेले बळी मिळवत विजयश्री खेचून आणण्याचा हेझलवूडचा मानस होता. मात्र कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या सामना अनिर्णीत राखण्याच्या निर्णयावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आणखी एक बळी मिळाला असता तर सामन्याचे चित्र पालटले असते, असा आशावाद त्याने व्यक्त केला. ‘‘ती चार षटके खेळायला हवी होती. सामना रंगतदार स्थितीत होता. खेळपट्टीकडून वेगवान तसेच फिरकी गोलंदाजांना साहाय्य मिळत नव्हते. परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ व्हायला हवा होता. तसे न झाल्याने आक्रमणाची इच्छा अपुरीच राहिली,’’ असे हेझलवूडने स्पष्ट केले.

Story img Loader