भारतीय संघाचा आधारस्तंभ आणि प्रमुख फलंदाज विराट कोहलीने कालच्या सामन्यातील खेळीने ऑस्ट्रेलियन एका दिग्गज फलंदाजाला मागे टाकले आहे. विराट आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये  एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज डेविड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने ही कामगिरी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध टी२० सामने खेळताना केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामने खेळताना एकूण ८ वेळा ५० किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. हा एक विश्वविक्रम ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सलामीवीर डेविड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरने श्रीलंका संघाविरुद्ध एकूण ७ वेळा ५० किंवा त्यापेक्षा मोठी खेळी केली आहे. आता वॉर्नर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा विराटचेच नाव आहे. विराटने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध ६ वेळा ५० धावांपेक्षा मोठी खेळी केली आहे. रोहित शर्मा देखील यादीत सहभागी आहे. रोहितने वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळताना प्रत्येकी ६-६ वेळा ५० पेक्षा मोठी खेळी केली आहे.

हेही वाचा   :  IND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर 

कोहलीने कालच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ३३ वे अर्धशतक केले. त्याने ४८ चेंडूत ६३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. या खेळीला त्याने तीन चौकार आणि चार षटकारांचा साज चढवला. सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूत ६९ धावा आणि विराटच्या वादळी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाकडून मिळालेले १८७ धावांचे लक्ष्य गाठले. भारताने चार गड्याच्या मोबदल्यात आणि १९.५ षटकांमध्ये सामना नावावर केला. मालिकेतील हा भारताचा सलग दुसरा विजय असून ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने पराभव स्वीकारला. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी२० मालिका जिंकल्यानंतर भारताला आता दक्षिण आफ्रिका संघाशी भिडायचे आहे. आफ्रिकी संघाविरुद्धची टी२० मालिका २८ सप्टेंबर पासून मायदेशात सुरू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli is the only one in t20 surpassing the legendary australian batsman avw