विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर १५ दिवसांनी भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहेत. या दौऱ्यासाठी बीसीसीआय कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देणार आहे. ३ ऑगस्टपासून भारताच्या विंडीज दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर सलामीलाच वेस्ट इंडिजचं आव्हान

“विराट आणि जसप्रीतला टी-२०, वन-डे मालिकेत विश्रांती दिली जाईल हे नक्की आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेपासून विराट सतत क्रिकेट खेळतो आहे. बुमराहवर अतिक्रिकेटमुळे येणारा ताण हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. मात्र हे दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात असतील.” बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली.

याचसोबत बीसीसीआय आणखी काही खेळाडूंनाही विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत धडक मारेल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त झाला आहे. मात्र भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला तर १४ जुलैपर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन विंडीज दौरा आखला गेला आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

Story img Loader