नवी दिल्ली : संघाला प्रगतीची दिशा दाखवण्यासाठी तुम्ही कर्णधार असणेच गरजेचे नाही. त्यामुळे आता अनुभवी खेळाडू म्हणून युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच फलंदाज म्हणून संघाच्या विजयात अधिकाधिक योगदान देण्यासाठी मी सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली.
कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्या मालिका पराभवानंतर भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी डिसेंबरमध्ये त्याची एकदिवसीय संघाच्या नेतृत्वपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांहूनही अधिक काळ ३३ वर्षीय कोहली एकही शतक झळकावू शकलेला नाही. त्यामुळे आता त्याला पुन्हा पूर्ण लयीत फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
‘‘महेंद्रसिंह धोनीने जेव्हा कर्णधारपद सोडले, त्यानंतरही आमच्यासाठी तो एक कर्णधारच होता. त्याच्या मतांचा आणि निर्णयांचा आम्ही आदर करायचो. संघाला प्रगतीच्या वाटेने नेण्यासाठी तो सातत्याने पुढाकार घ्यायचा. त्याचप्रमाणे आता मी कर्णधारपदावरून पायउतार झाल्यामुळे संघहिताच्या दृष्टीने घेण्यात येणाऱ्या निर्णयांमध्ये माझे योगदान नसेल, असे मुळीच नाही,’’ असे कोहली एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान म्हणाला.
‘‘फलंदाज म्हणून मी संघासाठी अधिक चमकदार कामगिरी करू शकतो. खेळाडू म्हणून तुम्हाला प्रत्येक भूमिका बजावता येणे गरजेचे आहे. तसेच संघात असंख्य युवा खेळाडू असून त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन,’’ असेही कोहलीने नमूद केले.
भारतीय खेळाडूंचे अहमदाबादला आगमन
वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी सोमवारी भारतीय खेळाडूंचे अहमदाबाद येथे आगमन झाले. सर्व खेळाडूंना पुढील तीन दिवस विलगीकरण करणे अनिवार्य असून त्यानंतर ते सरावाला प्रारंभ करू शकतील. इंग्लंडविरुद्ध नुकताच ट्वेन्टी-२० मालिका खेळणारा विंडीजचा संघ गुरुवापर्यंत येथे दाखल होईल. भारत-विंडीज यांच्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० लढती होणार आहेत.
‘फलंदाजीसाठी कोहलीने कर्णधारपद सोडले’
कोहलीच्या निर्णयामुळे माझ्यासह अनेकांना धक्का बसला असला, तरी फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठीच कोहलीने कर्णधारपद सोडले असावे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने व्यक्त केले. ‘‘कोहली कसोटी संघाच्या नेतृत्वपदावरून पायउतार झाल्यामुळे मला धक्का बसला. परंतु त्याला दडपण झुगारून खेळणे महत्त्वाचे वाटले असावे. त्याच्यामध्ये अद्यापही फलंदाजीच्या बळावर यशाचे शिखर सर करण्याची क्षमता आहे.’’ असे पाँटिंग म्हणाला.