यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधलं भारताचं आव्हान रविवारी संपुष्टात आलं. न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सोमवारी भारतानं वर्ल्डकपमधल्या शेवटच्या सामन्यामध्ये नामिबियाचा पराभव करून दौऱ्याचा शेवट गोड केला. मात्र, कर्णधार विराट कोहलीचा टी-२० कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. मात्र, यानंतर आता विराट कोहलीचं टी-२० संघातलं स्थान धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं टीकाकारांना आणि अशी शंका उपस्थित करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
क्रिकबझ लाईव्हसोबत बोलताना विरेंद्र सेहवागनं विराट कोहलीची एक टी-२० खेळाडू म्हणून पाठराखण केली आहे. “भारतीय संघासाठी कितीही नवोदित खेळाडू आले, तरी दुसरा विराट कोहली येणं अशक्य आहे. ज्या प्रकारे विराट कोहली आपल्या फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, ते पाहाता टी-२० संघामध्ये त्याच्या स्थानाविषयी शंका घेणं हे चुकीचं ठरेल. जोपर्यंत त्याची इच्छा आहे, तोपर्यंत तो टी-२० क्रिकेट खेळू शकतो”, असं सेहवाग म्हणाला आहे.
विरेंद्र सेहवाग पाठोपाठ भारताचा माजी जलदगती गोलंदाज आशीष नेहरा यानं देखील विराटची पाठराखण केली आहे. “फलंदाजीमध्ये विराट कोहलीपेक्षा चांगलं स्थैर्य तुम्हाला कुणीही देऊ शकणार नाही. तुम्ही फक्त फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांचा भरणा करू शकत नाही. तुम्हाला अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा योग्य समन्वय संघात आवश्यक आहे”, असं नेहरा म्हणाला.
विराट कोहलीची भन्नाट आकडेवारी!
२०१४ आणि २०१६ या दोन टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहली मालिकावीर ठरला होता. याशिवाय, आजघडीला जगात सर्वाधिक टी-२० धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. ८७ डावांमध्ये विराटनं तब्बल ३ हजा २२७ धावा फटकावल्या आहेत. त्याची सरासरी ५२.०५ असून स्ट्राईकरेट तब्बल १३७.९१ आहे. विराट कोहलीनं एकूण ५० टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यापैकी ३२ सामन्यांमध्ये भारतानं विजय मिळवला असून १६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.