भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी, भारतीय संघाने 4 दिवसांना सराव सामना खेळला. अपेक्षेप्रमाणे या सामन्यात सर्व फलंदाजांनी सराव करुन घेत चांगली खेळी केली. सामन्याचा निकाल जरी अनिर्णित राहिला असला तरीही शनिवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सर्वांना एक धक्का दिला. एरवी आपल्या बहारदार फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या विराटने सराव सामन्यात, गोलंदाजीही केली. इतकच नव्हे, तर आपल्या गोलंदाजीवर विराटने ऑस्ट्रेलियाच्या हॅरी निल्सेनला बाद केलं. सध्या सोशल मीडियावर विराटच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाकडून हॅरी निल्सेनने शतकी खेळी केली. मात्र विराटने कांगारुंची ही जमलेली जोडी फोडण्यासाठी चेंडू स्वतःच्या हाती घेतला. विराटच्या चेंडूवर जोरदार फटका खेळण्याच्या नादात निल्सेनने मिड ऑनवर उभा असलेल्या उमेश यादवच्या हाती झेल दिला. ही विकेट मिळाल्यानंतर विराट कोहलीचा आनंद गगनाम मावेनासा झाला होता. 6 डिसेंबरपासून दोन्ही देशांमधे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

Story img Loader