यश आणि पैसा नेहमीच हातात हात घालून वावरत असते, असे क्रिकेटपटूंच्या बाबतीत म्हटले तर वावगे ठरणार नाही. याबाबत उदाहरणच द्यायचे असेल तर भारताचा उपकर्णधार विराट कोहलीचे देता येईल. सातत्यपूर्ण धावांमुळे भारतीय संघाचा आधारस्तंभ बनलेला युवा फलंदाज विराट कोहली हा मैदानाप्रमाणेच आता जाहिरात आणि ब्रॅण्ड क्षेत्रातही चांगलाच स्थिरावल्याचे प्रत्ययास येत आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तिशी ओलांडली आहे, तर क्रिकेटमधील महानायक सचिन तेंडुलकर वयाची चाळिशी पार केल्यामुळे निवृत्तीकडे झुकला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये २४ वर्षीय युवा विराट कोहलीचा भाव कमालीचा वधारला आहे. क्रीडा साहित्य विक्री करणाऱ्या जर्मनीच्या ‘आदिदास’ या कंपनीने कोहलीशी प्रत्येक वर्षांसाठी दहा कोटी रुपयांचा सर्वाधिक रकमेचा करार करून क्रिकेटजगताचे डोळे दिपवले आहेत. या व्यवहारानिमित्ताने कोहली याने धोनी आणि सचिनला मागे टाकले आहे.
सध्या चॅलेंजर्स करंडक क्रिकेट स्पध्रेत दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीशी आदिदास कंपनीचे साहित्य आणि शूज यांच्या प्रसारासाठी तीन वर्षांचा करार केला आहे. सचिनने अनेक वष्रे या ब्रॅण्डचा प्रसार केला आहे. ताज्या माहितीनुसार, विराटने एमआरएफ टायर कंपनीशीही ६.५ कोटी रुपयांचाही वार्षिक करार केला आहे. सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ या उत्पादनाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स’ आहेत.
गतवर्षी कोहलीने जाहिरात आणि प्रसारणाच्या माध्यमातून गेल्या वर्षी ४० कोटी रुपयांची वार्षिक कमाई केली होती. परंतु सध्याच्या कोहलीच्या दोन मोठय़ा व्यवहारांमुळे यंदा त्याचा वार्षिक कमाईचा आकडा प्रचंड उंचावण्याची शक्यता आहे. सध्या पेप्सी, टोयोटो आणि सिन्थॉल डीओडरन्ट्ससहित १३ बडय़ा उत्पादनांच्या प्रसारणांत कोहलीचा सहभाग आहे.
जुलै महिन्यात प्रसारित झालेल्या ‘फोब्र्ज’ मासिकातील यादीनुसार, महेंद्रसिंग धोनीने वार्षिक ३.१५ कोटी अमेरिकन डॉलर्सची कमाई करीत जगातील सर्वात कमाई करणारा क्रिकेटपटू हा मान संपादन केला होता. त्यापाठोपाठ सचिन तेंडुलकरचा या यादीत समावेश होता. सचिनची वार्षिक कमाई २.२ कोटी अमेरिकन डॉलर्स होती. परंतु ताज्या व्यवहारांमुळे कोहली हा धोनी आणि सचिनला मागे टाकण्याची चिन्हे आहेत.
धोनी आणि सचिनपेक्षा विराटचा ब्रॅण्ड सरस!
यश आणि पैसा नेहमीच हातात हात घालून वावरत असते, असे क्रिकेटपटूंच्या बाबतीत म्हटले तर वावगे ठरणार नाही. याबाबत उदाहरणच द्यायचे असेल तर भारताचा उपकर्णधार विराट कोहलीचे देता येईल.
First published on: 28-09-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli leaves dhoni sachin behind the world of brand endorsements