हेडिंग्लेच्या निर्णायक वन-डे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुटने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने ८ गडी राखून सामना जिंकला. तत्पूर्वी भारतीय फलंदाजी निर्णायक वन-डे सामन्यात पुन्हा एकदा कोलमडली. विराट कोहलीचा अपवाद वगळता एकही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. विराटने कालच्या सामन्यात ७१ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र या सामन्यात आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली त्रिफळाचीत होऊन माघारी परतल्याचा क्षण हा निव्वळ पाहण्यासारखा होता.

भारताच्या महत्वाच्या फलंदाजाना माघारी धाडल्यासाठी आदिल रशिदला कालच्या सामन्यात, सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. आदिल रशिदने टाकलेला चेंडू टप्पा पडून थेट यष्ट्यांवर आदळला, काही क्षणांसाठी विराट कोहलीलाही रशिदचा हा चेंडू समजलाच नाही. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर असणारे भाव सर्व काही बोलून जात होते.

सामना संपल्यानंतर झालेल्या पारितोषीक वितरण समारंभात कोहलीने रशिदच्या चेंडूचं कौतुक केलं. रशिदच्या त्या चेंडूवर मी पुरतो गडबडलो होतो आणि हेच त्याचं यश असल्याचंही विराट म्हणाला. सुरुवातीला भारताने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत बाजी मारल्यानंतर इंग्लंडने वन-डे सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या कसोटी मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.