यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत अगदी पहिल्या सामन्यापासून टीम इंडियानं प्रत्येक विरोधी संघावर वर्चस्व गाजवलं आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात भारतानं अगदी सहज विजय संपादित केला आहे. याच जोरावर टीम इंडियानं अगदी सहज सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. या विजयात किंग कोहली अर्थात भारताची रनमशीन विराट कोहलीचाही मोठा वाटा राहिला आहे. विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल, त्याच्या आक्रमक खेळाबद्दल, त्याच्या खेळातील सातत्याबद्दल सध्या क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. पण आता खुद्द विराटनंच त्याचा सामन्यांमधला स्वत:चा असा गेमप्लॅन सांगितला आहे!

मधल्या फळीला सोबत घेऊन विराट कोहली भारतीय फलंदाडजीचा कणा समर्थपणे पेलताना पाहायला मिळत आहे. सामन्याच्या ज्या टप्प्यात जशी गरज आहे, तसा खेळ करून टीम इंडियाला विजयापर्यंत नेत आहे. त्यामुळे विराट खेळताना कोणत्या प्रकारे आखणी करतो, कसं नियोजन करतो? याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांनाही आहे. त्यासंदर्भात विराट कोहलीनं स्टार स्पोर्ट्सवरच्या ‘बिलीव्ह: दी दिवाली मिरॅकल’ या स्पेशल शोमध्ये बोलताना यावर भाष्य केलं आहे.

काय असतो किंग कोहलीचा प्लॅन?

या शोमध्ये २०२२ च्या टी२० वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर सविस्तर चर्चा दाखवली जात आहे. विराट कोहलीच्या या मुलाखतीमध्ये त्यानं या सामन्यासाठी कशी तयारी केली, काय चर्चा झाली, इतर खेळाडूंना काय सांगितलं, सामना चालू असताना सुरुवातीला लवकर विकेट्स पडल्यानंतर डाव कसा सावरला अशा अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. विजयासाठी १६० धावा आवश्यक असताना अवघ्या ३१ धावांवर भारताचे चार भरंवशाचे वरच्या फळीचे फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर काय नियोजन केलं? यावर विराटनं भूमिका मांडली.

Video: विराटचा ‘तो’ षटकार ठरला Shot of the Century! आयसीसीनं शेअर केला व्हिडीओ; तुम्ही पाहिलात का?

“मी नेहमीच खेळताना या गोष्टी बघत असतो की समोरच्या टीमचे खेळाडू कधी एकमेकांशी वाद घालायला लागतात. जेव्हा दोन धावा झाल्या तरी बॉलर, कीपर, कॅप्टनमध्ये फ्रस्ट्रेशन दिसायला लागतं, त्या क्षणी मी त्यांच्यावर दबाव टाकायला सुरुवात करतो. त्या स्थितीचा फायदा घ्यायला सुरुवात करतो”, असं विराटनं या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

शॉट ऑफ द सेंच्युरीबद्दल विराट काय म्हणतो?

दरम्यान, विराट कोहलीला या कार्यक्रमात त्यानं हारिस रौफला १९व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तडकावलेल्या भन्नाट षटकाराविषयीही विचारणा करण्यात आली. हा षटकार आयसीसीनं ‘शॉट ऑफ द सेंच्युरी’ म्हणून गौरवित केला आहे. “माझाही त्यावर विश्वास बसत नाही. म्हणजे कदाचित जर त्या शॉटची मी फक्त कल्पनाही करायीच म्हटली तरीही ती इतकी परफेक्ट मला करता येणार नाही. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा अनुष्काशी बोललो, तेव्हा तीही हेच म्हणाली”, असं विराट कोहली यावेळी म्हणाला.