दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध बंगळुरू सामन्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माची भेट घेतल्यामुळे कर्णधार विराट कोहली अडचणीत सापडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला नोटीस पाठवून, यासंदर्भात तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूने सामन्या दरम्यान संघातील सहकाऱ्यांशिवाय इतर कोणाशीही बोलायचे नसते. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात अनुष्का शर्मा प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती. पावसाच्या आगमनामुळे सामना थांबविण्यात आला होता. त्यावेळी व्हीआयपी दालनामध्ये जाऊन विराटने अनुष्काची भेट घेतली आणि जवळपास पाच मिनिटे दोघे गप्पांमध्ये रंगले होते. अनुष्काशी बोलून विराट कोहलीने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळेच त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्या कृतीवर ‘बीसीसीआय’ काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader