यश ज्याच्याशी हातमिळवणी करते, मिडास राजासारखा जो प्रत्येक गोष्टीचे सोने करतो, अशी महेंद्रसिंग धोनीची काही वर्षांपूर्वी प्रतिमा लोकांनी बनवली होती. कर्णधार असावा तर धोनीसारखाच, त्याच्यापुढे कोणतेच विश्व लोकांना दिसत नव्हते. तीच मंडळी धोनीने नेतृत्व सोडावे आणि विराट कोहलीकडे देण्यात यावे, अशी काही दिवसांपूर्वी म्हणत फिरत होती. लोकांचे एवढे मतपरिवर्तन व्हावे, एवढे वाईट धोनीच्या नेतृत्वाखाली संघाचे घडत नव्हते. पण लोकांना बदल हवा असतो, तो व्यवहार्य असो किंवा नसो. अखेर धोनीने आपल्या अनपेक्षितपणाची कास कायम धरत कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि आता कोहली भारतीय संघाचा सर्वेसर्वा झाला. धोनीची ही निवृत्तीची समयसूचकता योग्य असल्याचे म्हटले जात असले तरी खरी या गोष्टीची आत्ता गरज होती का, या गोष्टीचा विचार करायला हवा.
धोनी किती रणजी सामने कुठे, कधी खेळला, हे सध्या बऱ्याच चाहत्यांना आठवत नसावे. तशी त्याची देदिप्यमान कामगिरी वगैरे नव्हतीच. मुंबईतल्या एका स्पर्धेत त्याने उत्तुंग षटकार लगावले. निवड समितीच्या डोळ्यांत ते भरले अन् धोनी भारतीय संघात आला. आपली आक्रमकता कायम ठेवत त्याने स्वत:ला सिद्ध केले. वेस्ट इंडिजमध्ये २००७च्या विश्वचषकात भारताचे दिवाळे निघाले. त्यानंतर ट्वेंटी-२० विश्वचषकाची धुरा कुणाकडे सोपवायची, याचे कोडे सुटेना? धोनीच्या नावाचा पर्याय सुचवला गेला. कारण तो सगळ्यांशी सरावात मिळून मिसळून राहायचा. बीसीसीआय या क्रिकेटला फारसे गंभीरपणे घेत नव्हते. एखाद्या सहलीला जावे, तशी नवखी मुले जमवली, धोनीकडे नेतृत्व दिले. धोनीने आपल्या जिगरीच्या जोरावर ते आव्हान पेलले. विश्वचषक भारताने जिंकला. त्यानंतर आनंदाला उधाण आले. पण त्या उधाणामध्ये धोनीने शांतचित्ताने एक काम केले. आपली जर्सी त्याने तिथल्या एका लहान मुलाला घातली. या कृतीतला अन्वयार्थ बरेच काही सांगून गेला आणि त्याप्रमाणे छोटय़ा शहरातून आलेल्या, लहान समजल्या जाणाऱ्या धोनीचा भारतीय क्रिकेटमध्ये सत्तारंभ झाला. त्यानंतर चंचल असणारी परिस्थिती स्वभावानुसार बदलत गेली. धोनीकडे एकदिवसीय आणि त्यापाठोपाठ कसोटी संघाचे कर्णधारपद सुपूर्द करण्यात आले. सूत्र हातात आल्यावर संघातील वयस्कर खेळाडूंचा त्याला त्रास व्हायला लागला. हे ज्येष्ठ खेळाडू त्याच्या मार्गातून निघत गेले की त्यांना काढले गेले, हा विषय तसा गुलदस्त्यातलाच.
मग २०११ चा विश्वचषकही धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पटकावला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे धोनी कोणताही निर्णय घेताना कधी कचरला नाही. २००७ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जोगिंदर सिंगला गोलंदाजी देणे असो किंवा २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एस. श्रीशांतला खेळवणे असो. त्याचे सगळेच निर्णय पथ्यावर पडणारे नव्हतेच. पण त्याने त्याची तमा बाळगली नाही. त्याच्यावर टीका करण्याइतका तो त्या वेळी अयशस्वी नव्हता. धोनी नावाच्या गारुडाने भारतीयांना कवेत घेतले होते. भारतीयांसाठी धोनी हे विश्व बनत चालले होते आणि त्यामध्ये ते रमतही होते. पण २०११च्या विश्वचषकानंतर भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आणि धोनी नावाचा भारतीय संघावरील सूर्य मावळतीकडे झुकायला सुरुवात झाली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने या कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही धोनीच्या कर्णधारपदाखाली भारताने कसोटी मालिका मानहानीकारकरीत्या गमावली. त्यानंतर इंग्लंडने भारताला भारतात पराभूत करण्याची किमया साधली आणि चाहत्यांच्या मनातील धोनी म्हणजेच मिडास राजाच्या प्रतिमेला तडा गेला. त्यानंतर पूर्वीसारख्या प्रमाणात विजयही भारताच्या हाती लागत नव्हते. पराभवाची टक्केवारी वाढत चालली होती.
२०१४च्या इंग्लंड दौऱ्यात पुन्हा भारतीय कसोटी संघ हवालदिल झाला. ही कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा होताच. २०११-१२ सालच्या दौऱ्यातील पराभव टीकाकारांना दिसू लागले आणि धोनीला कर्णधारपदावरून हटवावे, अशी ओरड सुरू होतीच. त्यात धोनी जायबंदी झाला आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या सामन्यात कोहलीकडे कर्णधारपद आले. कोहलीने धावांची टांकसाळच उघडली. एकीकडे धोनी कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी ठरत होता आणि दुसरीकडे कोहली प्रतिस्पध्र्याच्या डोळ्याला डोळा भिडवत होता. ‘अँग्री यंग मॅन’ ही भारतीयांची सर्वात आवडती छटा. त्यामध्ये जो बसतो तो भारतीयांना लगेच भावतो. त्यामुळे कोहलीकडे कर्णधारपद कायमस्वरूपी द्यावे, यासाठी फक्त आंदोलन व्हायचे बाकी होते. धोनीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कोहलीकडे ते सुपूर्द करण्यात आले. कोहली आक्रमकतेची दुधारी तलवार घेऊन मैदानात उतरू लागला. एकामागून एक सामने जिंकत राहिला. लोकांना तो धोनीपेक्षा सरस वाटू लागला. कोहली सातत्याने क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात धावा करीत राहिलाच, ही गोष्ट त्याला दाद द्यावी अशीच. पण दुसरीकडे धोनीच्या चुका (ज्या पूर्वीही होत होत्याच) त्या आत्ता अधिक अधोरेखित केल्या जाऊ लागल्या. कोहलीने भारतीय संघाला विजयपथावर आणले. त्याच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीत अद्याप एकदाही भारतीय संघ पराभूत झालेला नाही. दुसरीकडे धोनीकडून एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटचे नेतृत्व काही वाईट होत नव्हते. पण कोहलीचे कसोटीतले यश पाहून त्याच्याकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटचेही नेतृत्व द्यायला हवे, ही चर्चा सुरू झाली. सरतेशेवटी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकाराचा पोत निराळा, पण तरीही फक्त कसोटी मालिकेच्या यशावरून ही मागणी जोर धरू लागली. धोनीने समयसूचकता दाखवली म्हणा, काळाची पावले ओळखली म्हणा किंवा अन्य काही, त्याने मर्यादित षटकांच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हायचे ठरवले.
धोनी आणि कोहली दोघांची शैली भिन्नच. धोनी जेवढा शांत त्यापेक्षा जास्त कोहली आक्रमक. या दोघांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे. धोनीने खेळाडू घडवले. आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना हे काही अद्भुत गुणवत्ता असलेले क्रिकेटपटू नाहीत. पण धोनीने त्यांच्या पाठीशी राहून त्यांची कामगिरी उंचावली. परिस्थितीनुरूप त्यांचा सामन्यात उपयोग केला. कुठे कुणाला वापरायचे हा निर्णय धोनी शिताफीने घ्यायचा. हे यापूर्वी भारताच्या कोणत्याही कर्णधाराला करता आले नाही. हा फरक धोनी आणि कोहलीसह अन्य कर्णधारांमध्ये नक्कीच असेल.
कोहली धोनीची उणीव भरून काढेल का, हा प्रश्न मोठा आहे. धोनीने आता कर्णधारपद सोडण्याची गरज नव्हती, असे मानणारा मोठा चाहता वर्ग आहे. चॅम्पियन्स करंडकापर्यंत तो कप्तान म्हणून हवा होता. पण निर्णय घेऊन तो मोकळा झाला. आता कोहलीच्या नेतृत्वाखाली धोनी पुढचा विश्वचषक खेळणार का, हे पाहणेच उत्सुकतेचे ठरेल.
प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com