मानसिक थकव्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला, नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषकात विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलं आहे. Gulf News ला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी विराट व संघाच्या कामगिरीविषयी गप्पा मारल्या. याचसोबत २०१९ विश्वचषक लक्षात घेता संघातील इतर खेळाडूंसाठीही आपल्या डोक्यात अशीच रणनिती तयार असल्याचं शास्त्री म्हणाले.

अवश्य वाचा – विराटला तोड नाही मात्र कर्णधार म्हणून रोहितची कामगिरीही उत्कृष्ट – वकार युनूस

“इंग्लंड दौऱ्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच आम्हाला आशिया चषकासाठी रवाना व्हायचं होतं. मात्र त्या क्षणी विराटला विश्रांतीची गरज होती. शाररिकदृष्ट्या तो अतिशय कणखर आहे. मैदानावर असताना त्याच्यातला उत्साह आपण सर्व जण पाहतोच. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या लागोपाठ दौऱ्यांमुळे विराटला विश्रांतीची गरज होती. यामुळे काहीकाळ तुम्ही शांत राहून नव्या दम्याने मैदानात पुनरागमन करु शकता.” शास्त्रींनी कोहलीला विश्रांती देण्यामागचं कारण सांगितलं.

आगामी काळात भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांच्यासह इतर खेळाडूंनाही विश्रांती देण्याचा विचार असल्याचं शास्त्रींनी स्पष्ट केलं. आशिया चषकाचं विजेतेपद मिळवल्यानंतर भारतीय संघ मायदेशात परतला असून, विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. ४ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेमधून विराट कर्णधारपदाची सुत्र सांभाळेल.

Story img Loader