विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मामधील मतभेदांमुळे बीसीसीआयचं वातावरण चांगलच ढवळून निघालं. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात झालेल्या पराभवानंतर, बीसीसीआय मर्यादीत षटकांच्या सामन्यात रोहित शर्माला कर्णधार करणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र विंडीज दौऱ्यासाठी पुन्हा एकदा विराट कोहलीकडेच भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनेही कर्णधारपदासाठी विराटलाच पाठींबा दिला आहे, मात्र विराटला चांगल्या प्रशिक्षकाची गरज असल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं योग्य ठरणार नाही. कर्णधार म्हणून भारताने गेल्या काही वर्षांत त्याच्यावर विश्वास टाकला आहे. माझ्यामते विराट कोहलीला आता चांगला प्रशिक्षक आणि निवड समितीची गरज आहे.” शोएब अख्तर आपल्या यू-ट्युब चॅनलवर बोलत होता.

रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर अख्तर म्हणाला, “रोहित एक चांगला कर्णधार आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. मात्र संघाचं नेतृत्व रोहितकडे सोपवण्यासाठी ही योग्य वेळ नाही. आताच्या घडीला विराट कोहली हाच कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार आहे.” विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा कसून सराव, विराटने जिंकली चाहत्यांची मनं

Story img Loader