Virat Kohli net practice with Sanjay Bangar video viral : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ३० फेब्रुवारीपासून तो रेल्वेविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. या सामन्यापूर्वी तो मैदानावर घाम गाळताना दिसला. यावेळी त्यांच्यासोबत माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगरही दिसले. त्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत विराट कोहलीची बॅट शांत राहिली होती. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावून या दौऱ्याची सुरुवात केली. मात्र, ही गती त्याला कायम राखता आली नाही आणि उर्वरित सामन्यांमध्ये त्याला धावा करण्यात अपयश आले. पाच सामन्यांच्या नऊ डावांमध्ये त्याने केवळ १९० धावा केल्या आणि त्याची सरासरीही २३.७५ इतकी होती.
विराट कोहलीकडून जुन्या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न –
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये किंग कोहली माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. यादरम्यान त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर फलंदाजीचा सराव केला. खरं तर, अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उजव्या हाताच्या फलंदाजाला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंचा खूप त्रास झाला होता. नऊ डावात आठ वेळा तो या प्रकारच्या चेंडूवर बाद झाला होता. आता तो या कमकुवतपणावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी विराटचा सराव सरु –
रणजी सामन्यानंतर विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला जाणार आहे. आगामी स्पर्धेपूर्वी माजी भारतीय कर्णधार आपल्या फॉर्ममध्ये परत येईल, अशी आशा चाहत्यांना आहे.