‘‘विराट कोहली हा चांगला कर्णधार आहे, यात कोणतीच शंका नाही. पण लगेचच त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे योग्य नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहलीच्या नेतृत्वगुणांची झलक पाहायला मिळाली. मात्र महेंद्रसिंग धोनी हा उत्तम कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आणखी काही काळ धोनीकडेच भारतीय संघाचे नेतृत्व सोपवायला हवे. धोनीनंतर भारताच्या नेतृत्वाची धुरा कोहलीच सांभाळू शकतो. कोहली हा भारताचा भविष्यातील कर्णधार आहे,’’ असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक मकरंद वायंगणकर यांच्या ‘गट्स अ‍ॅण्ड ग्लोरी’ या पुस्तकाचे अनावरण करताना ते बोलत होते.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान पंचांच्या चुकीच्या निर्णयानंतर वेंगसरकर यांनी पंचपुनर्आढावा पद्धतीस पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘ही पद्धत पूर्णपणे अचूक नाही, हे माझे मत असले तरी पंचांच्या खराब कामगिरीमुळे भारताने पंचपुनर्आढावा स्वीकारायला हवी, हे मला पटले.’’
‘खडूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई संघाच्या कामगिरीबाबत वेंगसरकर म्हणाले की, ‘‘सध्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघांनाही चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक चांगले खेळाडू अशा संघांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक करून चालणार नाही. कोणत्याही क्षणी विजय मिळवण्याची वृत्ती खेळाडूंमध्ये असायला हवी. याआधी पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने अनेक सामने जिंकले आहेत. मुंबईला स्पर्धात्मकतेची उणीव जाणवत आहे. कांगा लीग, क्लब क्रिकेट या स्पर्धामुळे युवा खेळाडूंना अनुभवी खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या स्पर्धाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’’
‘‘क्रिकेटचा प्रत्येक प्रकार महत्त्वपूर्ण आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमुळे खेळाडूंना तसेच राज्य संघटनांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली. छोटय़ा राज्यांतील खेळाडूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे युवा खेळाडूंनी कोणत्याही प्रकारात खेळताना योग्य समतोल साधणे गरजेचे आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader