महान फलंदाज सुनील गावस्कर यांची ध्यानचंद पुरस्कार अर्थात जीवनगौरव पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. युवा फलंदाज विराट कोहलीची अर्जुन पुरस्काराकरता बीसीसीआयने शिफारस केली आहे. मधल्या फळीत सातत्याने धावा करत भारतीय संघाच्या फलंदाजीचा अविभाज्य घटक झालेला कोहली हा बीसीसीआयतर्फे अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेला एकमेव खेळाडू आहे.
गेल्यावर्षी खेळाडूंची शिफारस करण्याच्या मुद्यावरुन बीसीसीआय आणि क्रीडा मंत्रालयात वाद झाला होता. शिफारसींचे अर्ज वेळेत मिळाले नसल्याची तक्रार बीसीसीआयने मंत्रालयाकडे केली होती.
यंदा बीसीसीआयने चपळता दाखवत निर्धारित वेळेतच आपल्या शिफारसी मंत्रालयाकडे दाखल केल्या आहेत. मंगळवार, ३० एप्रिल ही अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य तसेच ध्यानचंद पुरस्कारांसाठी शिफारस दाखल करण्याची अंतिम तारीख होती.
आयसीसीच्या वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून कोहलीची निवड झाली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या कोहलीने कसोटी सामन्यातही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला. ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱ्यात त्याने अॅडलेड कसोटीत शतक झळकावले. मायदेशात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने सातत्याने धावा फटकावल्या. आशिया चषकासाठी त्याची संघाच्या उपकर्णधारपदी झालेली निवड संघातील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची साक्ष देते. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊनच कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी अपंग धावपटू एच.एन. गिरिशा आणि हॉकीपटू संदीप सिंग यांची शिफारस करण्यात आली आहे. गिरिशाने लंडन ऑलिम्पिकमध्ये उंच उडी प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली होती. या ऐतिहासिक प्रदर्शनाकरता गिरिशाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि आता राजीव गांधी पुरस्कारावरही त्याचे नाव कोरले जाणार आहे.
ऑलिम्पिकनंतर क्रीडाक्षेत्रात विशेष उल्लेखनीय यश क्रीडापटूंनी मिळवलेले नसल्यामुळे गेल्यावर्षी पुरस्कारांनी हुलकावणी दिलेल्या क्रीडापटूंचीच शिफारस पुन्हा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा