बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन जारी करत, विराटसोबत एकदिवसीय कर्णधारपदाबाबत चर्चा झाली होती आणि मुख्य निवडकर्त्यांनेही या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला होता असे म्हटले होते. मात्र, कोहलीने या सर्व गोष्टी फेटाळून लावल्या. अशा परिस्थितीत गांगुलीच्या दाव्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने स्वत: या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते, पण काही काळानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकले. यानंतर संपूर्ण वाद सुरू झाला आहे. विराटला वनडे आणि कसोटीत कर्णधारपदी राहायचे होते. मात्र त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने विराटला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर भाष्य केले होते.

“मी आता थकलो आहे, गेल्या अडीच वर्षापासून…”; रोहित शर्मासोबतच्या कर्णधारपदाच्या वादावर विराटने सोडले मौन

“हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतला होता. खरे तर बीसीसीआयने विराटला टी-२० चे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती, पण त्याला ते मान्य नव्हते. यानंतर, दोन भिन्न लोक मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करावेत, असे निवड समितीला वाटत नव्हते. त्यामुळे विराट कोहली केवळ कसोटी संघाचे कर्णधारपद, तर रोहित शर्मा टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार असेल हे निश्चित झाले. अध्यक्ष या नात्याने मी वैयक्तिकरित्या विराटशी याबद्दल बोललो. याशिवाय निवड समितीनेही त्याच्याशी याबाबत चर्चा केली,” असे सौरव गांगुलीने म्हटले होते.

त्यावर आता विराट कोहलीने पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. “मी टी २०चे कर्णधारपद सोडू नये असे बोर्डाने कधीच म्हटले नाही असा खुलासा विराटने केला आहे. मी टी-२० कर्णधारपद सोडण्यापूर्वी बोर्डाशी बोललो होतो, असे कोहलीने सांगितले. बोर्डानेही माझ्या म्हणण्याशी सहमती दर्शवली. मी टी-२० चे कर्णधारपद सोडू नये, असे बोर्डाने कधीच म्हटले नाही,” असेही विराट म्हणाला.

“अफवांवर विश्वास ठेवू नका, मी एकदिवसीय मालिका…”, विराट कोहलीनं दिलं स्पष्टीकरण!

मला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद हवे होते आणि माझी बोर्डाशी चर्चा सुरू होती असे त्याने म्हटले होते. पण यापूर्वी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की, आम्ही कोहलीला टी २० च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास थांबवले होते. त्यामुळे आता या गांगुली आणि विराट यांच्या वक्तव्यांमध्ये मोठा विरोधाभास दिसून येत आहे.

दरम्यान, रोहित शर्मासोबतच्या कर्णधारपदाच्या वादावर विराट कोहलीने मौन सोडले आहे. “माझ्या आणि रोहितमध्ये कोणतीही अडचण नाही. गेल्या अडीच वर्षांपासून मी यावर स्पष्टीकरण देत आहे. या चर्चांमुळे मी आता थकलो आहे,” असे विराट कोहलीने म्हटले आहे.