भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा फोर्ब्स मासिकाच्या मानाच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. जगभरातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या शंभर जणात विराटने स्थान मिळवलं आहे. मात्र या वर्षी विराटच्या स्थानामध्ये घसरण झाली असून तो थेट शंभराव्या स्थानावर फेकला गेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत विराट ८३ व्या जागेवरुन थेट १०० व्या स्थानावर घसरण झाली आहे.
अवश्य वाचा – World Cup 2019 : टीम इंडियाला मोठी ‘राहत’, गब्बरला आहे खेळण्याची आशा !
विराट कोहलीच्या वार्षिक कमाईमध्ये यंदा अंदाजे ७ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. १७३ कोटी वार्षिक कमाई करुनही विराटचं स्थान घसरलं आहे. या यादीमध्ये अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेसी पहिल्या स्थानी आहे. मेसीने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलंय. मेसीची कमाई ही अंदाजे ८८१.७२ कोटींच्या घरात गेलेली आहे. तर रोनाल्डाने गेल्या वर्षभरात ७५६.३५ कोटी कमावले आहेत.
या यादीमध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराटच्या तुलनेत मेसीची कमाई पाच पटीने अधिक आहे. खेळाडूंचा वार्षिक पगार, स्पर्धांमधून जिंकलेली रक्कम, जाहीरातींमधून मिळणारा पैसा यावरुन फोर्ब्सच्या यादीमधलं स्थान ठरवलं जातं.