India vs Pakistan, Asia Cup 2023: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने २ सप्टेंबर रोजी पल्लेकेले येथे झालेल्या आशिया चषक २०२३ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने दोन भारतीय दिग्गज फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांना बाद केले. सामन्यानंतर शाहीन आफ्रिदीला त्याच्या आवडत्या विकेटबद्दल विचारण्यात आले आणि त्याने रोहित आणि विराट या दोघांच्या विकेट महत्त्वाच्या असल्याचं सांगितलं. त्यात तो म्हणाला, “मी माझ्या गोलंदाजीबद्दल समाधानी असून मला दोन्ही विकेट्स सारख्याच होत्या,” असं तो म्हणाला.
या अफलातून गोलंदाजीनंतर शाहीन शाह आफ्रिदी म्हणाला, “नव्या चेंडूवर आमची ही योजना होती. माझ्या मते दोन्ही (विराट आणि रोहित) महत्त्वाचे विकेट्स होते. माझ्यासाठी प्रत्येक फलंदाज समान आहे, मग तो विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा पण मला रोहितच्या विकेटचा जास्त आनंद झाला. आमच्या वेगवान गोलंदाजांची योजना कामी आली. नसीम १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे. त्याच्या या गोलंदाजीबद्दल मी खूप आनंदी आहे. तो एक उत्तम वेगवान गोलंदाज असून नवीन चेंडू स्विंग आणि सीम करू शकतो, परंतु त्यानंतर जास्त नाही. एकदा चेंडू जुना झाला की (धावांचा पाठलाग करताना) धावा काढणे सोपे होते. त्यामुळे त्याने त्याच्यावर अजून काम करायला हवे.”
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इशान किशनच्या शानदार ८२ आणि हार्दिक पांड्याच्या स्फोटक फलंदाजीच्या कामगिरीमुळे शनिवारी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया चषक २०२३च्या मोहिमेतील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानच्या जबरदस्त वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाविरुद्ध भारताला २६६ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. मात्र, नंतर पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द झाला असून दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. यासह पाकिस्तानचे दोन सामन्यांत एकूण तीन गुण झाले आहेत. यापूर्वी नेपाळविरुद्धचा पहिला सामना जिंकून त्यांना दोन गुण मिळाले होते. ते सुपर फोरसाठी पात्र ठरले आहेत. भारताकडे आता एक गुण आहे आणि सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या पुढील सामन्यात नेपाळला पराभूत करणे आवश्यक आहे. त्यांच्याविरुद्धचा सामना जरी पावसामुळे रद्द झाला तरी भारत पुढील फेरीसाठी पात्र होईल. कारण, भारताचे अशा परिस्थितीत दोन गुण होतील आणि नेपाळला एक गुण मिळेल. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ पुढील फेरीसाठी पुढे जातील आणि नेपाळचा प्रवास येथे संपेल. मात्र, जर नेपाळने भारताला हरवले तर मग नेपाळ पुढील फेरीसाठी पात्र होईल आणि भारत आशिया चषकातून बाहेर पडेल.