करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. करोनाने क्रीडा विश्वालाही दणका दिला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. IPL चे आयोजनदेखील लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सर्व क्रिकेटपटू लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत. नुकताच माजी तडाखेबाज फलंदाज युवराज आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांनी लाईव्ह चॅटद्वारे संवाद साधला. त्यावेळी युवराजने बुमराहशी ‘रॅपिड फायर’चा खेळ खेळला आणि त्याला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारले.

असा रंगला रॅपिड फायरचा खेळ :

युवराज – विराट कोहली की सचिन तेंडुलकर?

बुमराह – युवी पा, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून फक्त चार वर्षे झालीत. मी मोठं उत्तर देतोय हे मला मान्य आहे, पण माझ्या केवळ चार वर्षाच्या अनुभवावरून मी त्यांच्यातील उत्तम कोण हे सांगू शकत नाही. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर ही दोन्ही मोठी नावं आहेत. त्यांच्यातील एक नाव निवडण्याची माझी पात्रता नाही, कारण ते दोघेही माझ्यापेक्षा खूप जास्त काळ क्रिकेट खेळत आहेत.

युवराज – तुला नियम आधीच सांगितले होते. त्यामुळे आता स्पष्ट उत्तर दे.

बुमराह – हा प्रश्न विचारणं म्हणजे युवराज आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांपैकी एकाची निवड करण्यासारखं झालं. माझ्यासाठी दोघेही समानच आहेत.

युवराज – तरीही एक नाव सांगावंच लागेल…

बुमराह – ठीक आहे! सचिन पाजींचे फॅन्स जास्त आहेत. त्यामुळे सध्या मी त्यांचं नाव घेतो…

यानंतर युवराजने बुमराहला आणखी एक बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारला.

युवराज – धोनी की युवराज? मधल्या फळीतला तुझा आवडता फलंदाज कोण?

बुमराह – युवी पाजी, तुम्ही आणि धोनी, दोघांनी एकत्र भारताला अनेक विजय मिळवून दिलेले पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे. मुद्दाम असा प्रश्न कशाला? तुम्ही सांगितलेले सगळेच खेळाडू माझे आवडते आहेत. तुमच्या दोघांची जेव्हा-जेव्हा भागीदारी होत होती, तेव्हा प्रत्येकच वेळी मला आनंद व्हायचा. त्यामुळे असं सांगणं कठीण आहे.

त्यानंतर अखेर युवराजने त्याची त्या प्रश्नातून मुक्तता केली. पण त्यानंतरही युवराजने बुमराह इतर प्रश्न विचारले. पण या दोन प्रश्नांची उत्तरं देताना मात्र बुमराहची खरी कसोटी लागली.

Story img Loader