विराट कोहलीवरील प्रेमापोटी स्वत:च्या घरावर तिरंगा झेंडा फडकावल्यामुळे तुरूंगात रवानगी झालेल्या पाकिस्तानी चाहत्याला जामीनावर सोडण्यात आले आहे. येथील ओकारा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाने उमर द्राझ याची जामीनावर मुक्तता केल्याचे वृत्त डॉन या वृत्तपत्राकडून देण्यात आले आहे.
पंजाब प्रांतातील ओकारा जिल्ह्य़ात राहणारा २२ वर्षांचा उमर द्राझ हा व्यवसायाने शिंपी असून तो भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा जबरदस्त चाहता आहे. २६ जानेवारीला भारताने टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात कोहलीने ९० धावा फटकावल्या. त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी उमरने त्याच्या घरावर भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिसांनी उमरवर पाकिस्तानी दंड संहितेच्या कलम १२३- अ नुसार (देशाच्या सार्वभौमत्वाला हानी पोहचवणारे कृत्य केल्याबद्दल) गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ासाठी १० वर्षांपर्यंतची कैद व दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

Story img Loader