Virat Kohli Passes Yo Yo Test Before Asia Cup 2023: टीम इंडियाने आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची तयारी जोरात सुरू आहे. या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. आशिया चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या सहा दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले आहे, जिथे खेळाडूंच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, यो-यो टेस्ट पास झाल्यानंतर विराट कोहलीने आनंद व्यक्त केला.
किंग कोहलीने यो-यो चाचणी उत्तीर्ण केली आहे. या बाबत विराट कोहलीने अधिकृत इन्स्टाग्रामवरून एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये तो शर्टलेस आणि जमिनीवर बसलेला दिसला. या फोटोच्या माध्यमातून त्याने यो-यो चाचणी पूर्ण केल्यानंतर आनंद व्यक्त केला. कोहलीने लिहिले, “धोकादायक शंकूच्या दरम्यान यो-यो चाचणी पूर्ण केल्याबद्दल आनंदी.” पुढे, त्याने यो-यो स्कोअर १७.२ आणि डन लिहले.
वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते शतक –
वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाकडून विराट कोहलीने नुकताच शेवटचा सामना खेळला. आता तो आशिया कपच्या माध्यमातून मैदानात परतणार आहे. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता, ज्यामध्ये त्याने शतक झळकावले. यानंतर वनडे मालिकेतील एका सामन्यात कोहलीही संघाचा भाग होता, मात्र तो फलंदाजीसाठी आला नव्हता.
पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार टीम इंडिया –
विशेष म्हणजे ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय संघ २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा महान सामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. आशिया कपमध्ये एकूण १३ सामने होणार आहेत, ज्यामध्ये ४ पाकिस्तान आणि ९ श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर खेळणार आहे. विशेष म्हणजे यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे.
आशिया चषकसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा.