Ab De Villiers on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी बंगळुरू येथील एनसीए कॅम्पमध्ये संघाचा सराव सुरू आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, शुबमन गिल इत्यादी आघाडीच्या फलंदाजांनी पहिल्या दिवशी नेटमध्ये जवळपास २ तास फलंदाजी केली. टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारताची फलंदाजी मजबूत आहे पण चौथ्या क्रमांकावर कोण योग्य ठरेल, हा वादाचा मुद्दा आहे. विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने याबाबत सूचनावजा सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स आगामी आशिया चषकात विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. डिव्हिलियर्स म्हणतो की, “कोहली या चौथ्या क्रमांकावर संघाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, परंतु तो या भूमिकेसाठी तयार आहे की नाही हे माहित नाही. मी तुम्हाला सांगतो की, विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये बहुतेक वेळा क्रमांक-३ वर फलंदाजी केली आहे आणि त्याला या स्थानावर प्रचंड यश मिळाले आहे, परंतु किंग कोहलीचा नंबर-४ वरचा रेकॉर्ड खराब आहे असे नाही.” विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत भारतासाठी एकूण ४२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ५५.२१ च्या सरासरीने १७६७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतके झळकावली आहेत.
एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली आयपीएलमध्ये आरसीबी संघात दीर्घकाळ एकत्र खेळले. डिव्हिलियर्स निवृत्त झाला असून कोहली अजूनही खेळत आहे. एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारतीय फलंदाजीबाबत सूचना दिल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोहली योग्य आहे, असे त्याचे मत आहे. त्याने मान्य केले की कोहलीचा तिसऱ्या क्रमांकावरचा विक्रम खूप चांगला आहे पण, दुसरीकडे संघाला गरज पडल्यास कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो असे सुचवले.
डिव्हिलियर्स म्हणाला, “टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करावी यावर आम्ही अजूनही बोलत आहोत. विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो असे मी ऐकले आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी याला माझे समर्थन आहे. या जागेसाठी तो परिपूर्ण डावाला आकार देणारा खेळाडू आहे.”
विराट कोहली या स्थानावर उत्कृष्ट विक्रमी फलंदाजी करत असल्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान सोडण्यास प्राधान्य देणार नाही, असे डिव्हिलियर्सने मान्य केले. एका दशकाहून अधिक काळ या पदावर त्याने मोठे यश संपादन केले आहे, परंतु संघाच्या गरजेनुसार नवीन भूमिकांशी जुळवून घेण्यासही त्याने तयार असले पाहिजे.
विराट चौथ्या क्रमांकासाठी योग्य आहे – एबी डिव्हिलियर्स
डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “मला वाटते की विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य खेळाडू आहे. तो डाव चालवू शकतो, मधल्या फळीत फलंदाजी करताना कोणतीही भूमिका बजावू शकतो. तो करेल की नाही हे मला माहीत नाही. आम्हाला माहित आहे की त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडते. त्याच स्थानावर खेळताना त्याने खूप धावा केल्या आहेत, परंतु शेवटी जर संघाला तुमच्याकडून वेगळे काहीतरी हवे असेल तर तुम्ही ती भूमिका बजावण्यास तयार असले पाहिजे.”