दुखापतग्रस्त विजय शंकरला विश्वचषक संघातलं स्थान गमवावं लागल्यानंतर, मयांक अग्रवालला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. अग्रवालच्या निवडीमुळे माजी क्रिकेटपटू ते चाहते सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. अंबाती रायुडूसारखा अनुभवी फलंदाज असताना मयांक अग्रवालसारख्या तुलनेने नवख्या फलंदाजावर निवड समितीने विश्वास का टाकला असेल हा प्रश्न सर्वांनाच्या मनात घोळत होता. या घटनेनंतर अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मिळालेल्या माहितीनुसार, मयांक अग्रवालच्या संघात निवडीमागे रवी शास्त्री-विराट कोहली या जोडीचा हात असल्याचं समजतंय.

IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मयांक अग्रवालला संघात स्थान देण्याचा निर्णय हा निवड समितीने नाही तर भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. निवड समितीनेही संघ व्यवस्थापनाच्या मागणीला प्रतिप्रश्न न करता अग्रवालच्या संघातील सहभागावर मोहर उमटवली. भारत अ, वेस्ट इंडिज अ आणि इंग्लंड अ यांच्यातील तिरंगी मालिकेत मयांक अग्रवालने केलेली कामगिरी त्याच्या निवडीला कारणीभूत ठरल्याचं बोललं जातंय.

दरम्यान अंबाती रायुडूने या प्रकरानंतर निवृत्ती स्विकारणं पसंत केलं आहे. भारतीय संघाच्या माजी खेळाडूंनी रायुडूच्या निवृत्तीवरुन बीसीसीआयच्या निवड समितीला टीकेलं लक्ष्य बनवलं आहे. रायुडूच्या निवृत्तीला निवड समिती जबाबद असल्याची अप्रत्यक्ष टीका गौतम गंभीरने केली आहे. याचसोबत विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ यांनीही अग्रवालच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.