Virat Kohli on Team India: भारतीय क्रिकेट संघाने नेदरलँड्सचा पराभव करत विजयी मोहीम सुरू ठेवली. आता उपांत्य फेरीत संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यात जो कोणी संघ जिंकेल तो विश्वचषक २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वानखेडे येथे १५ नोव्हेंबरला पहिला उपांत्य सामना होणार आहे, त्यासाठी टीम इंडियाचे आज मुंबईत आगमन होणार होते मात्र, भारतीय संघाआधी विराट कोहली एकटाच पोहोचला आहे. त्याचा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली मुंबई विमानतळावर पोहोचल्याच्या व्हिडीओमध्ये तो एकटाचं दिसत आहे. चेहऱ्यावर मास्क घातलेला कोहलीला पाहून जेव्हा चाहते फोटो काढायला आले तेव्हा कोहलीनेही मास्क काढून त्यांच्याबरोबर फोटो काढले. दुसरीकडे, तो संघाबरोबर का आला नाही याबाबत सोशल मीडियात चर्चा सुरु झाली आहे. काल रात्रीपर्यंत तो बंगळुरूमध्ये होता, जिथे भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना खेळला गेला होता आणि त्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले होते. त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील स्टेडियममध्ये होती, ती कोहलीची गोलंदाजी पाहून खूप आनंदी दिसत होती आणि विराटची विकेट घेतल्यानंतर तिची प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली. एवढे सगळे असतानाही तो एकटा का आला? याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

या विश्वचषकात विराट कोहलीने २ शतकी खेळी खेळली खेळल्या आहेत. त्याने पहिले शतक (१०३) बांगलादेशविरुद्ध आणि दुसरे शतक (१०१) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केले. याशिवाय कोहलीने २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत ५ अर्धशतके देखील केली आहेत. सध्या कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे, त्याने ९ सामन्यात ५९४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ९९ इतकी असून जी या विश्वचषकातील सर्वोच्च आहे.

विश्वचषकाच्या साखळी फेरीतील ४५व्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने चाहत्यांना विजयाची भेट दिली. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. या संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग नववा विजय मिळवला. २००३च्या विश्वचषकातील सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम त्यांनी मोडला. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. २००३ आणि २००७ मध्ये त्याने ११ सामने जिंकले होते.

हेही वाचा: IND vs NED: ‘मिस्टर ३६०’ चमकला! जडेजा-राहुलला मागे टाकत सूर्यकुमार यादवने पटकावलं मेडल, पाहा Video

विश्वचषक २०२३साठी टीम इंडियाचा संपूर्ण १५ सदस्यीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), प्रसिध कृष्णा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.