Virat Kohli airport video viral ahead IND vs NZ Series and BGT : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी भारतात पोहोचला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तत्त्पूर्वी विराट कोहली मुंबई विमानतळावर दिसला, यादरम्यान काही चाहते त्याच्यासोबत फोटो काढताना दिसले तर काही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसले. यादरम्यान एक चाहता म्हणाला बीजीटीत आग लावायची आहे, यावर विराट कोहली थोडा चकित झाला आणि त्याने आश्चर्याने प्रश्न विचारला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विराट कोहलीचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली विमानतळावरून त्याच्या कारकडे जात असताना चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. विराट कारमध्ये बसणार होता, तेव्हा एका चाहत्याने त्याला सांगितले, ‘बीजीटी (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) मध्ये आग लावायची आहे.’ यावर कोहलीची प्रतिक्रिया आश्चर्यचकित करणारी होती. यानंतर त्याने माघारी वळून विचारले की आग कशात लावायची आहे? यावर चाहता म्हणाला, मी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेबद्दल बोलतोय. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट कोहलीने तब्बल ८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळू शकला नव्हता. चेन्नई कसोटी कोहलीसाठी चांगली ठरली नाही, तर कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत पहिल्या डावात ३५ चेंडूत ४७ धावा केल्या आणि दुसऱ्या डावात २९ धावांवर नाबाद राहिला. हा सामना भारताने ७ विकेट्सनी जिंकत मालिकाही खिशात घातली.

हेही वाचा – PAK vs ENG : ‘जर आम्ही १० विकेट्स…’, शान मसूदने पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवाचे खापर कोणावर फोडले?

विराटचे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर लक्ष –

विराट कोहलीचे लक्ष आता न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेवर आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाक सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर असेल. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये कोहलीच्या नावावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्याने २५ सामन्यात ४७.४९ च्या सरासरीने २०४२ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये या स्टार फलंदाजाने १३ सामन्यांमध्ये १३५२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ६ शतके आणि ४ अर्धशतके आहेत.