Virat Kohli Statement on T20I Retirement U-Turn for Olympic: विराट कोहलीने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. विराटने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आता आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. विराट अजूनही कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्त्व करत आहे. दरम्यान आयपीएल २०२५ पूर्वीच्या आरसीबीच्या कार्यक्रमामध्ये विराट कोहलीने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

शनिवारी (१५ मार्च) आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये बोलताना विराटने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबद्दल त्याच्या योजनांबद्दल सांगितले. कोहलीने सांगितले की ऑलिम्पिकमध्ये खेळणे ही त्याच्यासाठी एक आकर्षक कल्पना होती. विराट कोहलीने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतल्यानंतर पुढील योजनांबद्दल विराटला विचारले असता तो म्हणाला की, निवृत्तीनंतर मी काय करेन हे मला अजूनतरी माहीत नाही. नुकताच मी एका टीममेटला हाच प्रश्न विचारला आणि मला तेच उत्तर मिळाले. होय, पण खूप प्रवास नक्कीच करेन.

स्पोर्ट्स समिटमध्ये अँकर इसा गुहा यांनी कोहलीची मुलाखत घेतली. एलए ऑलिम्पिकमध्ये खेळण्यात रस आहे का, असा प्रश्न तिने विराटला विचारला. या प्रकरणावर बोलताना कोहलीने गंमतीने सांगितले की, भारत ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा सामना खेळत असेल तरच एका अटीवर परत खेळायला उतरेन.

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबत विराट म्हणाला, “जगभरात अनेक टी-२० लीग खेळल्या जातात आणि मला वाटते की त्यातही आयपीएलची नक्कीच मोठी भूमिका आहे. यामुळे क्रिकेटला अशा टप्प्यावर नेले आहे की तो ऑलिम्पिकचा एक भाग बनला आहे. आमच्या काही खेळाडूंसाठी ही एक चांगली संधी असणार आहे.”

ईसा गुहाने विराटला प्रश्न विचारला की तू निवृत्तीतून माघर घेऊ शकतोल का, यावर विराट म्हणाला, “नाही… ऑलिम्पिकसाठी? कदाचित… जर संघ सुवर्णपदकासाठी सामना खेळत असेल तर मी एका सामन्यासाठी परत मैदानात उतरू शकतो (हसत हसत म्हणाला) मेडल जिंकेन आणि घरी परत जाईन. ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन बनणं एक कमालीची भावना असेल.”

विराट कोहली आयपीएल २०२५ पूर्वी आरसीबीच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. आयपीएलचा सलामीचा सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल.

Story img Loader