गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षेनुसार चांगल्या धावा करण्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली संघर्ष करत आहे. आता विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तो तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीद्वारे भारतीय संघात कमबॅक करेल. दुसऱ्या कसोटीत विराट खेळू शकला नव्हता, त्याचा तोटा भारतीय संघाला सहन करावा लागला आणि त्यांनी ही कसोटी गमावली. आता विराट पुन्हा संघात येणार असल्याने फलंदाजीला बळकटी मिळणार आहे. तत्पूर्वी त्यानं पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींची दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिलेला सल्ला विराटने अजूनही लक्षात ठेवल्याचे त्याने उघड केले.
खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटचे कसोटी क्रिकेटमधील शेवटचे शतक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी बांगलादेश विरुद्ध कोलकाता कसोटीत झाले. विराट बऱ्याच दिवसांपासून सतत ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूंवर झेलबाद होत आहे. यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे, तर चाहते त्याला ट्रोल करत आहेत. पण त्यामुळे कोहलीला फारसा फरक पडलेला नाही.
आज सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला, “महेंद्रसिंह धोनीने मला एकदा सांगितले होते की, एकच चुक पुन्हा होणार असेल तर त्यात किमान ७-९ महिन्यांचे तरी अंतर असावे, तरच तुझी कारकीर्द मोठी होऊ शकते. हा सल्ला मी कायमचा लक्षात ठेवला होता.”
विराट म्हणाला, “देशासाठी कामगिरी केल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो, कधी कधी गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. गेल्या एका वर्षात माझ्यासाठी असे काही क्षण आले आहेत आणि त्याचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.”
हेही वाचा – IND vs SA : विराटचं कमबॅक, तर ‘हा’ खेळाडू अनफिट; पत्रकार परिषदेत म्हणाला; ‘‘मला कोणालाही…”
यादरम्यान विराटने यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचेही समर्थन केले, जो अनेकदा त्याच्या खराब शॉट निवडीमुळे टीकाकारांच्या निशाण्यावर असतो. पंतच्या शॉट निवडीबाबत तो म्हणाला, ”आपण आपल्या कारकिर्दीत चुका केल्या आहेत.” उद्या ११ जानेवारीपासून दोन्ही संघात निर्णायक कसोटी खेळवली जाणार आहे. आत्तापर्यंत एकदाही भारताने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही.