एकीकडे क्रिकेट विश्वाचा बादशाह विराट कोहली आणि दुसरीकडे बॉलिवूडची ‘मस्तानी’ अभिनेत्री दीपिका पदुकोण हे सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील या दोन सेलिब्रिटींना जाहिरातींसाठीही असंख्य विचारणा येत असतात. कारण हे दोघे जर एखाद्या जाहिरातीत झळकले तर अर्थातच त्या ब्रँडसाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. हाच विचार करून एका ट्रॅव्हल वेबसाइटने या दोघांना एकत्र घेऊन जाहिरात करण्याचा विचार केला. मात्र, विराटने ऐनवेळी दीपिकासोबत जाहिरात करण्यास नकार दिला आहे. याचा फटका आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघालाही बसला आहे.
आयपीएलच्या नव्या सिझनसाठी ही जाहिरात बनवण्यात येणार होती. मात्र, विराटने दीपिकासोबत ती जाहिरात करण्यास नकार दिल्याने आरसीबीचा ११ कोटी रुपयांचा करार होऊ शकला नाही. ‘गो आयबीबो’ कंपनीला विराट आणि दीपिकासोबत जाहिरात करायची होती. आरसीबीसोबत हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी विराटने नकार दिला. त्यामुळे आरसीबीला हा करार रद्द करावा लागला.
‘गो आयबीबो’च्या जाहिरातीसाठी दीपिका ब्रँड अॅम्बेसिडर असल्याने त्यांनी विराटसोबतच्या जाहिरातीत दीपिकालाही समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विराटच्या मते, कंपनीच्या जाहिरातीत जर ब्रँड अॅम्बेसिडर सहभागी होत असेल तर ही आरसीबीची जाहिरात नसेल कंपनीची जाहिरात होईल. म्हणूनच त्याने जाहिरातीस नकार दिला.