एका दशकापूर्वी अशी स्थिती होती की सचिन तेंडुलकरला बाद करा आणि भारताला हरवा असं विरोधी संघ म्हणायचे. जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाची आशा प्रतिस्पर्ध्याला नसायची. आता सचिनची जागा विराटनं घेतल्याचं दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटनं एकहाती खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवलं आणि लाज राखली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडच्या पहिल्या डावातल्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताची अवस्था पाच गडी गमावत १०० धावा नी सात बळी गमावत १६९ धावा अशी झाली होती. परंतु तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत अत्यंत जबाबदार खेळी करणाऱ्या विराटनं १४९ धावांची कप्तानपदाला साजेसी खेळी केली आणि भारताला २७४ धावांपर्यंत नेलं. विराटनं कसोटी सामन्यांमधलं २२ वं शतक ठोकलं. विशेष म्हणजे कर्णधार झाल्यानंतरचं त्याचं हे १५वं शतक आहे. इंग्लंडमध्ये याआधीच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरलेला विराट यावेळी उट्टं फेडताना दिसत आहे. जोपर्यंत विराट उभा आहे तोपर्यंत भारत काहीही करू शकतो असं आता इंग्लंडमध्येही घडताना दिसत आहे.

इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज कुर्राननं चार बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या कुर्राननं एकाच षटकामध्ये मुरली विजय व लोकश राहूलला बाद करत भारताची अवस्था बिकट केली होती. मात्र, विराट आल्यावर त्यात काहिसा बदल झाला. अजिंक्य रहाणे मोठी खेळी करेल असं वाटत होतं पण अवघ्या १५ धावांवर तोही बाद झाला आणि विराटच्या खांद्यावर अब्रुरक्षणाची जबाबदारी पडली जी त्यानं अत्यंत खंबीरपणे निभावली. नंतर तर उमेश यादव व ईशांत शर्मा या ज्यांचा बॅटीशी काही संबंध नाही अशा अडगळीतल्या फलंदाजांना घेत त्यानं किल्ला लढवला व फक्त १३ धावांची पिछाडी घेत भारताचा डाव संपला.

इंग्लंडसाठी चार बळी घेणाऱ्या कुर्राननं विराटचं कौतुक करताना भारताचा डाव आम्ही संपवला होता, परंतु विराटनं आमची निराशा केली असे उद्गार काढले. विराटला फलंदाजी करताना बघणं यातच खूप शिकण्यासारखं आहे असं सांगताना कुर्राननं त्याला अत्यंत अचूक गोलंदाजी करावी लागते, जरा जरी चूक झाली तरी लगेच शिक्षा होते असं मोठ्या मनानं सांगितलं.

इंग्लंडमध्ये भारताचं काय होणार याची चुणूक पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच आली आहे. गेल्या दशकात ज्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ आणि विजय यांच्यामध्ये सचिन तेंडुलकर उभा असायचा आता विराट कोहली उभा असतो, याचंच दर्शन गुरूवारी घडलं. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका कशी असेल याची चुणूकच पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दिसली असून ही मालिका इंग्लंड विरुद्ध विराट कोहली अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको!

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli reminds batting of sachin tendulkar