टी-२० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीनं आपण टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हा त्यानं सर्वांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलं होतं. मात्र, आता टी-२० कर्णधारपदासोबतच विराट कोहलीकडून वन-डे टीमचं देखील कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळे विराट कोहलीचा फॉर्म, त्याच्यातले नेतृत्वगुण आणि त्याच्याकडून काढून घेण्यात आलेलं कर्णधारपद यावरून मोठी चर्चा आणि वाद सुरू झाला आहे. विराट कोहलीला बीसीसीआयनं पायउतार होण्यासाठी २ दिवसांची मुदत दिली होती अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे.
आधी कर्णधारपद काढलं, मग कौतुक केलं!
भारतीय क्रिकेटसाठी गेल्या २४ तासांचा काळ नाट्यमय घडामोडींचा ठरला. जवळपास पाच वर्षे कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीची इच्छा नसतानाही एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली, याची कारणमीमांसाही न करण्यात आल्याने चाहत्यांनी दिवसभर ‘बीसीसीआय’वर ताशेरे ओढले. कोहलीप्रेमींचा वाढता रोष पाहून ‘बीसीसीआय’ने सायंकाळी भूमिकेचे स्पष्टीकरण दिल आणि त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीची प्रशंसा केली. अध्यक्ष सौरव गांगुलीने मर्यादित षटकांसाठी दोन कर्णधार नकोत, हे निवड समितीचे धोरण असल्याचे मांडले. मात्र या सर्व घटनांमुळे भारतीय संघात सगळे काही आलबेल नसल्याचे स्पष्टपणे जाणवले.
या सर्व प्रकारानंतर आता असं अचानकपणे विराट कोहलीचं कर्णधारपद का काढून घेण्यात आलं? यावर चर्चा सुरू झाली आहे. त्याची अनेक कारणं क्रिकेटचाहते आणि विराटचे फॅन देत असले, तरी नितीन राऊत यांना मात्र यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असल्याचा संशय येत आहे. “पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठिशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करतायत ना!” असा दावा नितीन राऊत यांनी ट्वीटमध्ये केला आहे.
शमीच्या बाजूने उभा राहिला होता विराट!
टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामीच्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावरून भारतीय संघावर टीका तर होत होतीच, मात्र त्यासोबतच क्रिकेटपटू मोहम्मद शमीला देखील त्याच्या धर्मावरून ट्रोल केलं जात होतं. यावेळी विराट कोहली शमीच्या बाजूने उभा राहिला होता.
“आमचे लक्ष्य बाहेरच्या ड्रामेबाजीवर नाही. आम्ही पूर्णपणे सामन्यावर लक्ष्य केंद्रित करत आहोत. कुणावरही धर्माच्या आधारावर निशाणा साधणे चुकीचे आहे. काही जण सोशल मीडियावर आपली ओळख लपवून या पद्धतीची कृत्य करतात. आता हे सर्व रोजचेच झाले आहे. हा जीवनातील सर्वात खालचा स्तर असून अशा पद्धतीने त्रास दिला जातो. आम्ही आमच्या ड्रेसिंग रुममधले वातावरण खेळमेळीचे ठेवतो. बाहेर जो काही ड्रामा सुरु आहे, तो पूर्णपणे त्यांच्या चुका दाखवत आहे. मी कधीच कुणासोबत असा भेदभाव केला नाही. काही लोकांचे फक्त हेच काम असते. जर कुणाला मोहम्मद शमीचे खेळातील योगदान दिसत नसेल, तर मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही”, असे विराटने म्हटले होते.
विराटचं कर्णधारपद आणि जय शाह
दरम्यान, विराट कोहलीनं शमीची बाजू घेतल्याचा संदर्भ देत बीसीसीआयमधील ‘शाहजादे’ अर्थात जय शाह यांच्यावर नितीन राऊत यांनी निशाणा साधल्यामुळे त्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.