विराट कोहली हा भारतीय क्रिकेटमधील ‘राजपुत्र’ आहे. सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यानंतर त्याची उणीव भरून काढण्याची क्षमता कोहलीकडे आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी सांगितले.
‘‘सचिन निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघात मोठी पोकळी निर्माण होईल असा भ्रम कोणी करून घेऊ नये. क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपाच्या सामन्यांमध्ये सचिनइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची शैली कोहलीकडे आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने दोन शतके झळकावत आपली शैली सिद्ध केली आहे,’’ असे चॅपेल यांनी सांगितले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने केलेल्या शतकांचा विक्रम मोडण्याची क्षमता कोहलीकडे आहे असे विधान ज्येष्ठ कसोटीपटू सुनील गावसकर यांनी जाहीरपणे केले होते. त्यास दुजोरा देत चॅपेल म्हणाले, ‘‘सचिनच्या निवृत्तीमुळे आमच्या गोलंदाजांनी सुस्कारा टाकला असेल तर तो अयोग्य होईल. सचिनइतकीच टोलेबाजी करण्याची शैली कोहलीच्या खेळात आहे. सचिनरूपी सम्राट निवृत्त होत असला तरी कोहलीच्या रूपाने नव्या राजपुत्राचे आगमन झाले आहे. हा अन्य देशांच्या गोलंदाजांना इशाराच आहे. मैदानात चौफेर फटकेबाजी करण्याची शैली सचिनकडे आहे. शारजाला सचिनने केलेल्या दोन शतकांइतकीच सफाईदार शैली कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दोन शतकांमध्ये दिसून आली. अवघड परिस्थिती असतानाही आक्रमक खेळ करीत शतक झळकावण्यात कोहली तरबेज आहे.’’
‘‘पर्थ येथील कसोटी सामन्यात सचिनने शतक केले होते. कोहलीला पर्थ येथे शतक साकारता आले नसले तरी त्याने केलेल्या ७५ धावा सचिनच्या शतकाइतक्याच अव्वल दर्जाच्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच कसोटीतही आत्मविश्वासाने फलंदाजी आपण करू शकतो हे कोहलीने दाखवून दिले आहे. सचिनसारखाच कोहली हादेखील भारतीय क्रिकेट क्षेत्रातील तेजस्वी तारा आहे,’’ असे चॅपेल यांनी सांगितले.
‘‘सचिन व कोहली यांच्या खेळात बरेचसे साम्य असले तरी त्यांच्यात थोडासा फरक आहे. सचिनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला शालेय जीवनातच प्रारंभ झाला तर कोहली याची कारकीर्द उशिरा सुरू झाली. कोहलीपेक्षा सचिन हा अतिशय संयमी व कमालीचा शांत खेळाडू आहे. कोहली हा मात्र लवकर संतापतो. कोहलीने आपल्या रागावर, भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे तरच तो सचिनसारखाच महान खेळाडू होऊ शकेल,’’ असा सल्लाही चॅपेल यांनी दिला.  

Story img Loader