वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीचे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तब्बल १२ वर्षांनी पुनरागमन होणार असून आज, गुरुवारपासून रेल्वेविरुद्ध होणाऱ्या अखेरच्या साखळी लढतीत तो दिल्लीचे प्रतिनिधित्व करणार आहे. हा सामना पाहण्यासाठी १० हजारहून अधिक प्रेक्षक दिल्लीच्या फिरोझ शाह कोटला स्टेडियमवर उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

कोहलीला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यातच भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध, मग ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमाविल्यानंतर ‘बीसीसीआय’ने कठोर पावले उचलताना आपल्या सर्व करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा खेळणे बंधनकारक केले. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांसारख्या नामांकित खेळाडूंनी रणजी स्पर्धेच्या गेल्या सामन्यांत सहभाग नोंदवला. कोहलीने मात्र मानेच्या दुखापतीमुळे सामना खेळणे टाळले. परंतु आता त्याचे दशकभराहूनही अधिक काळानंतर दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे.

‘‘विराट भाई चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्याने आम्हाला सकारात्मक मानसिकता राखून खेळण्याचा सल्ला दिला आहे,’’ असे दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी याने सांगितले. कोहलीने गेले दोन दिवस कोटलाच्या मैदानावर कसून सराव केला. आता आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपूर्वी लय मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असेल. कोहलीला गेल्या वर्षी खेळलेल्या १० कसोटी सामन्यांच्या १९ डावांत केवळ एक शतक आणि एक अर्धशतक करता आले. त्याने २४.५२च्या सरासरीने अवघ्या ४१७ धावा केल्या. विशेष म्हणजे कोहलीला २०१८ सालानंतर कसोटी क्रिकेटमध्ये केवळ तीन शतके करता आली आहेत. त्यामुळे लाल चेंडूविरुद्ध खेळताना स्वत:मधील क्षमता पुन्हा सिद्ध करण्याचा आणि मोठी खेळी करण्याचा त्याचा मानस असेल.

महाराष्ट्राचा त्रिपुराशी सामना

एलिट ‘अ’ गटातील अन्य एका लढतीत महाराष्ट्रासमोर त्रिपुराचे आव्हान असेल. गुणतालिकेत महाराष्ट्र (१४ गुण) आणि त्रिपुरा (१३ गुण) हे संघ सध्या अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी असून बाद फेरीच्या शर्यतीतून ते बाहेर झाले आहेत. महाराष्ट्राने गेल्या सामन्यात बडोद्याला पराभूत केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांचा रणजी हंगामाची विजय सांगता करण्याचे लक्ष्य असेल. अनुभवी ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असून एका सामन्याच्या बंदीनंतर अंकित बावणेचेही पुनरागमन अपेक्षित आहे.

राहुलचाही सहभाग

विराट कोहलीप्रमाणेच भारताचा आघाडीच्या फळीतील फलंदाज केएल राहुलही बऱ्याच वर्षांनंतर रणजी स्पर्धेत सहभाग नोंदविणार आहे. हरियाणाविरुद्धच्या सामन्यात तो कर्नाटकाचे प्रतिनिधित्व करेल. तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणे अपेक्षित आहे. बुधवारी नेट्समध्ये सराव करताना राहुल लयीत दिसला. आता हरियाणाविरुद्ध मोठी खेळी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. कर्नाटकाचा संघ एलिट ‘क’ गटात १९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून त्यांच्यासाठी विजय महत्त्वाचा ठरणार आहे. कर्नाटकाच्या संघात कर्णधार मयांक अगरवाल, देवदत्त पडिक्कल आणि प्रसिध कृष्णा यांसारख्या कसोटीपटूंचाही समावेश आहे.

● वेळ : सकाळी ९.३ ० वा.

● थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा अॅप