बीसीसीआयने (BCCI) भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि ऋषभ पंतला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (IND vs WI) शेवटच्या टी-२० सामन्याआधीच बायो बबलमधून ब्रेक दिला आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आपआपल्या घराकडे रवाना झालेत. ते दोघेही वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सहभागी होणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयने विराट कोहली आणि ऋषभ पंतला १० दिवसांचा ब्रेक दिल्याचं वृत्त आहे. त्यामुळेच दोघेही श्रीलंके विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत सहभागी होणार नाही. २४ फेब्रुवारीपासून लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिक सुरू होत आहे. यानंतर श्रीलंका आणि भारतात २ सामन्यांची कसोटी मालिका देखील होणार आहे. यात विराट कोहली आणि ऋषभ पंत सहभागी होतील. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी मालिका कोहलीसाठी १०० वा कसोटी सामना असेल.

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कोहली आणि पंत दोघांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली. कोहलीने सुरुवातीला डाव संभाळला, तर पंतने सामन्याच्या अखेरीस दमदार कामगिरी केली.

रोमांचक सामन्यात विंडीजचा पराभव; रोहित ब्रिगेडनं टी-२० मालिका जिंकली!

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ८ धावांनी मात दिली. या विजयासह तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत रोहित ब्रिगेडने २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेस्ट इंडीजचा कप्तान कायरन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी दमदार अर्धशतके ठोकत पाहुण्यांना १८७ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने दमदार झुंज दिली. निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी मोठ्या फटक्यांची आतषबाजी करत संघाला विजयाजवळ नेले, पण त्यांची झुंज अपुरी ठरली. विंडीजचा संघ २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंतच पोहोचू शकला. भुवनेश्वर कुमारला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

वेस्ट इंडीजचा डाव

भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना काईल मेयस आणि ब्रँडन किंग यांनी विंडीजला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी ३३ धावांची भागीदारी केली. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलने मेयर्सला (९) आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर रवी बिश्नोईने किंगला (२२) आपल्या फिरकीत अडकवले. सलामीवीर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरन आणि रोवमन पॉवेल यांनी धावगती पुढे नेली. या दोघांच्या भागीदारीदरम्यान भारतीय संघाने दोन झेल सोडले.पूरन-पॉवेलने भारतीय गोलंदाजाविरुद्ध खोऱ्याने धावा जमवत शतकी भागीदारी केली.

शेवटच्या दोन षटकात विंडीजला २९ धावांची आवश्यकता होती. १९व्या षटकात भुवनेश्वरने पूरनला बिश्नोईकरवी झेलबाद केले. पूरनने ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावा केल्या. हर्षल पटेलने टाकलेल्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चार चेंडूत वेस्ट इंडीजला २३ धावांची आवश्यकता होती. पॉवेलने दोन षटकार खेचत धाकधुक वाढवली, पण हर्षलने नियंत्रित गोलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरवला. भारताने हा सामना ८ धावांनी जिंकला. वेस्ट इंडीजला २० षटकात ३ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचला आले. पॉवेलने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६८ धावांची झुंज दिली.

भारताचा डाव

वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेलने भारताला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने भारताचा सलामीवीर इशान किशनला (२) स्वस्तात तंबूत धाडले. त्यानंतर कप्तान रोहित शर्माने विराट कोहलीसह संघाचे अर्धशतक पूर्ण केले. विराट आक्रमक शैलीत खेळला. रोहित रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने २ चौकार आणि एका षटकारासह १९ धावा केल्या. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादवही (८) चेसला बळी ठरला. विराटने ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. अर्धशतकानंतर चेसने त्याची दांडी गूल केली.

हेही वाचा : VIDEO : याच्यापेक्षा गल्ली क्रिकेट बरं..! ‘त्या’ रनआऊटनंतर हरमनप्रीत कौरवर नेटकरी खवळले; तुम्हीच पाहा!

संघाचे चार फलंदाज तंबूत परतल्यानंतर ऋषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी चौकार-षटकारांसह धावा जमवल्या. शेवटच्या षटकात रोमारियो शेफर्डने अय्यरला बोल्ड केले. अय्यरने १८ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३३ धावा केल्या. पंत २८ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांवर नाबाद राहिला. भारताने २० षटकात ५ बाद १८६ धावा केल्या. विंडीजकडून चेसने २५ धावांत ३ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli rishabh pant break from bio bubble will skip third t20 match against wi and srilanka pbs