विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय खेळाडूंप्रमाणेच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांचा स्वप्नभंग झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेमधून विश्वचषक स्पर्धेच्या संघातील बहुतेक खेळाडूंनी ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या मालिकेत उतरवण्यात आला आहे. मात्र, विराट कोहली व रोहित शर्मा या भारताच्या दोघा स्टार खेळाडूंनी फक्त याच मालिकेतून ब्रेक घेतला नसून ते थेट टी २० क्रिकेटमधूनच निवृती घेणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
BCCI च्या धोरणाची चर्चा!
बीसीसीआयकडून पुढील वर्षी होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आत्तापासूनच संघ बांधणीवर काम करण्यात येत आहे. त्यासाठीच बीसीसीआयकडून या संघात तरुण खेळाडूंना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच या संघात विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पण दुसरीकडे बीसीसीआयकडून या दोघांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने क्रिकट्रॅकर संकेतस्थळानं दिलं आहे.
निर्णय दोघांवर सोपवला!
या वृत्तानुसार, बीसीसीआयनं टी २० विश्वचषक स्पर्धेत खेळायचं की नाही, यासंदर्भातला निर्णय पूर्णपणे विराट कोहली व रोहित शर्मा या दोघांवरच सोपवला आहे. या दोघांनी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला, तरी बीसीसीआयकडून त्यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे आता विराट कोहली व रोहित शर्मा नेमका काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून या दोघांनी बाहेर राहणं पसंत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Ind vs Aus: अंतिम सामन्यात मैदानावरच रडला; पराभवाबाबत सिराज म्हणतो, “यावेळी कदाचित…!”
दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी होऊ शकतो निर्णय?
विराट कोहली व रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेत खेळत नसले, तरी त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ते परतणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण या दोघांकडून त्यांच्या टी २० करिअरविषयीच्या भवितव्याविषयी निर्णयाची बीसीसीआयला प्रतीक्षा असून आगामी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधीच या दोघांकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. या दौऱ्याआधीच बीसीसीआयकडून व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
राहुल द्रविडचा नेमका निर्णय काय?
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर राहुल द्रविडनं त्याच्या प्रशिक्षकपदाबाबत सूतोवाच केले होते. “मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहणार की नाही? याविषयी अद्याप मी विचार केलेला नाही. माझं पूर्ण लक्ष या विश्वचषक स्पर्धेवरच केंद्रीत होतं. पण मला वेळ मिळताच मी त्यावर विचार करेन”, असं राहुल द्रविड म्हणाला होता. त्यामुळे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक कोण असतील? यावर चर्चा सुरू झाली आहे.