२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, भारतीय संघात फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. रोहित शर्मा आपल्या सहकाऱ्यांना सोडून पत्नी आणि मुलीसह भारतामध्ये दाखल झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात रोहित आणि विराटमध्ये मतभेद झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं. या सर्व गोष्टींवर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

“होय, त्या क्षणी संघात काही प्रमाणात मतभेद होते, मात्र आता सगळं काही व्यवस्थित आहे. एका निर्णयाला प्रत्येक खेळाडूचा पाठींबा मिळेल, असं कधीच होत नाही. संघाची रणनिती काय असावी, कोणत्या खेळाडूने कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जावं यासारख्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही चर्चा करतो. अनेकदा महत्वाच्या खेळाडूंमध्ये एकमत होत नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि भारतीय संघात प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याची मुभा आहे. अंतिम निर्णय हा सर्वांच्या सहमतीनेच घेतला जातो.” एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत भारत अरुण बोलत होते.

अवश्य वाचा – संघात निवड करायची की नाही, तुम्हीच ठरवा ! धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात

विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआय, वन-डे आणि टी-२० सामन्यांसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवणार असून विराटकडे फक्त कसोटी संघाची जबाबदारी देणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र रविवारी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाली, ज्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे.

Story img Loader