Virat Kohli run out video viral in IND vs NZ 3rd test match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या बळावर न्यूझीलंडला २३५ धावांत गुंडाळले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने अवघ्या ८६ धावांत ४ विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज आणि विराट कोहली बाद झाले आहेत. यापैकी विराट कोहली ज्या प्रकारे रनआऊट झाला, ते आत्मघातकी होते, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहलीसाठी न्यूझीलंडविरुद्धची मायदेशात खेळली जाणारी कसोटी मालिका एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. कारण संपूर्ण मालिकेत विराट कोहलीला अपयशाचा सामना करावा लागत आहे. बंगळुरू आणि पुणे कसोटीनंतर आता मुंबई कसोटीत त्याच्यासोबत असेच काहीसे घडले, जे पाहून त्याच्या चाहत्यांना विश्वास बसणार नाही. मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या ४ धावांवर विराट कोहली रनआऊट झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे रनआऊट होण्यात विराट कोहलीचीच चूक होती.
विराट कसा रनआऊट झाला?
भारताच्या पहिल्या डावाच्या १९व्या षटकात विराट कोहलीची विकेट पडली. रचिन रवींद्रच्या तिसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने मिड-ऑन दिशेने शॉट खेळून एक धाव चोरण्याचा प्रयत्न केला, पण हेन्रीने एका हाताने चेंडू पकडला आणि तो थेट स्टंपवर आदळला आणि विराट रनआऊट झाला. विराट कोहलीनेही डायव्हिंग केले पण तो क्रीजच्या आत पोहोचू शकला नाही. विराट कोहली कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा रनआऊट झाला.
भारताने अवघ्या ६ धावांत गमावल्या ३ विकेट्स –
भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट लवकर गमावली होती. रोहित शर्मा केवळ १८ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला ताब्यात घेतले. पण त्यानंतर १८ व्या षटकापासून भारतीय संघाच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी सुरू झाली. संघाची धावसंख्या ७८ धावा असताना यशस्वी जैस्वाल रिव्हर्स स्वीप खेळून बाद झाला. यानंतर टीम इंडियाने सिराजला नाईट वॉचमन म्हणून पाठवले आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीनेही वैयक्तिक ४ धावांवर आपली विकेट फेकली. टीम इंडियासाठी पहिला दिवस चांगला जाऊ शकला असता पण ६ धावांच्या आत सर्व काही बदलले.