रोहित शर्मामध्ये कर्णधार होण्याचे गुण आणि क्षमता ठासून भरली असून तो भारताचा भावी कर्णधार होऊ शकतो, असे मत भारताचा युवा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराटने झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये ५-० असे घवघवीत यश संपादन केले होते. धोनीनंतर कोहली आणि सुरेश रैना यांच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. यामध्ये धोनीनंतरचा यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.
‘‘ क्रिकेटच्या बाबतीत चांगली बुद्धिमत्ता रोहितकडे आहे. झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये मी त्याच्याकडून बऱ्याचदा सल्ले घेतले होते. मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून देताना त्याने त्याच्यामध्ये कर्णधाराची क्षमता असल्याचे सिद्ध केले आहे,’’ असे कोहलीने सांगितले. अर्जुन पुरस्कारासाठी विराटच्या नावाची मंगळवारी शिफारस करण्यात आली. याबद्दल ट्विटरवर त्याने आपली प्रतिक्रिया दिली. ‘‘अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याने मी आनंदित आहे. आतापर्यंतची माझ्या आयुष्यातील ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे. शुभेच्छांसाठी धन्यवाद !’’

Story img Loader